सांगली - माझ्या मिशीला खरकटे लागलेले नाही. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतच राहणार आहे. जोपर्यंत जिभेला धार आहे तोपर्यंत माझा संघर्ष सुरूच राहील. शेतमालाला दर मिळण्या साठी केवळ रस्त्यावरचा संघर्ष उपयुक्त ठरत नाही, तर कायद्यातही सुधारणा करावी लागणार आहे. यासाठी मला २०२४ मध्ये लोकसभेत जायचे आहे. ते काम दिल्लीत जावून करणे मला शक्‍य झाले. मग तो उसाचा दर असो किंवा दूधाचा दर. विधानसभेत आणि लोकसभेत एका सदस्याची ताकद काय असते हे मी दाखवू शकलो.लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी हितापेक्षा व्यापारी हिताकडे अधिक लक्ष दिले जात  असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली येथील राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टतर्फे आयोजित जनसेवा पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना सांगितले. 

  राजमती ट्रस्टच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार आणि नाशिक येथील सह्याद्री फार्मसचे अध्यक्ष विलास शिंदे यांना राजमती नेमगोंडा पाटील जनसेवा पुरस्कार श्रवणबेळगोळचे चारूकीर्ती महास्वामी यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. 

     

 यावेळी बोलताना चारूकीर्ती महास्वामी म्हणाले, कृषी क्षेत्र हा देशाचा कणा आहे.कितीही औद्योगिक प्रगती झाली तरी कृषी विकास होत नाही तोपर्यंत या विकासाचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचणे अशक्य आहे.राजू शेट्टींचा लढा मोठा आहे. या लढ्यातून उभा राहिलेला शेतकरी विदेशा पर्यंत कसा पोहचेल, असे काम विलास शिंदे यांची कंपनी करतेय.
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानद सचिव सुरेश पाटील यांनी  केले.
 राजगोंडा पाटील,अविनाश पाटील,दीपक पाटील यांंनाही गौरवण्यात आले.
 यावेळी राजतमी भवनच्या वातानुकुलित विभागाचे उद्‌घाटन झाले.विलास शिंदे यांच्यातर्फे कंपनीचे व्यवस्थापक मंगेश भास्कर यांनी पुरस्कार स्विकारला. 
 
Top