सातारा - खो खो खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धांतून जिल्ह्याची एक नवी ओळख निर्माण होणार असून खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून या खेळाचा नावलौकिक वाढवावा. आंतराराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. 
  क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व फलटण एज्युकेशन सोसायटी,फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६५ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते.
 प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन ज्योत प्रज्वलित करण्यात आली. तसेच त्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना श्री.पाटील म्हणाले, ऐतिहासिक फलटण शहरामध्ये अनेक खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने होत असते. आज देशपातळीवरील स्पर्धा येथे आयोजित केली आहे. अशा स्पर्धा घेणे हे मोठे जोखमीचे काम आहे. अशा स्पर्धांचे नियोजन करणे ही फार मोठी जबाबदारी असते. या खेळाला चालना देत असताना अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा राज्य शासनामार्फत घेतल्या जातात. आज या स्पर्धेच्या निमित्ताने देशभरातून आलेल्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडले. या नगरीमधील परंपरा त्यानिमित्ताने पुढे आली. विविध राज्यांमधून आलेल्या खेळाडूंची सोय येथे चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे. खो-खो, कबड्डी किंवा अन्य खेळांच्या स्पर्धा राज्य शासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा स्थानिक कार्यकर्त्यांच्या नियोजनाशिवाय यशस्वी होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
   छत्रपती शिवरायांची भूमी आणि खेळ व लोककलांच्या ऐतिहासिक महत्त्वाने संपन्न असलेल्या या भूमीत देशाच्या विविध भागातून आलेल्या खेळाडूंचे स्वागत करताना आपल्याला अतीव आनंद झाल्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. येथील खो-खो चे प्रेरणादायी वातावरण खेळाडूंना सतत प्रेरणा देत राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
   दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात स्थानिक शालेय विद्यार्थ्यांनी आंध्र राज्यातील लमाणी नृत्य आणि महाराष्ट्रीय दांडपट्टा, लाठीकाठीचे प्रात्यक्षिक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये, लेझीम मधील विविध क्रिडाप्रकार उत्तम प्रकारे सादर केले.

  फलटणला लाभलेल्या खेळाच्या उज्वल परंपरेच्या पार्श्वभूमीवर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश आणि सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंचा पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  स्पर्धेसाठी देशाच्या २० राज्यातून मुलांचे ३० व मुलींचे ३० असे एकूण ६० संघ दाखल झाले असून त्या माध्यमातून सुमारे ९०० ते १००० खेळाडू, २५० क्रिडा मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक आणि १०० वर पंच येथे दाखल झाले आहेत.
  स्पर्धांसाठी श्रीमंत शिवाजीराजे क्रिडा नगरीमध्ये ४ मैदाने तयार करण्यात आली आहेत. प्रेक्षकांसाठी सुमारे ५ हजार क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली असल्याचे प्रस्ताविकात महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्रीडा समिती फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे यांनी केले.
   यावेळी आ. दिपक चव्हाण, महानंदचे उपाध्यक्ष डी.के.पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top