पंढरपूर – “अभिनय ही रेसिपीसारखी कला असून आपल्या पूर्वानुभवातून ती व्यक्त करता येते. शृंगार, वीर, करुण, अद्भूत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र व शांत या नवरसाच्या अभ्यासाने अभिनय प्रभावी बनवावा लागतो. अभिनय ही जगण्याची कला असून त्यासाठी सातत्यपूर्ण साधना करावी लागते. विद्यार्थ्यांनी अभिनयाचे क्षेत्र निवडले तर त्यांच्यासाठी खूप संधी उपलब्ध आहेत.” असे प्रतिपादन कवी व दिग्दर्शक आकाश बनसोडे यांनी केले. 
 रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पदव्युत्तर पातळीवरील युजीसी-सीपीई अंतर्गत ‘परफॉर्मिंग आर्ट’ या कोर्सच्या अभ्यागत व्याख्यानात’अभिनयाचे तंत्र आणि कौशल्य’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा. सुभाष कदम हे होते. 
आकाश बनसोडे पुढे म्हणाले की, “रोजच्या जगण्यात अभिनय असतो. अभिनयाच्या क्षेत्रात येवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वत: मधील गुण ओळखणे आवश्यक आहे. कमर्शिअल व आर्ट मुव्हीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे उद्देश वेगवेगळे असतात. त्यामुळे आपला उद्देश लक्षात घेवून क्षेत्र निवडावे.” 
  अध्यक्षीय भाषणात प्रा. सुभाष कदम म्हणाले , “विद्यार्थ्यांनी स्वत:चे स्वप्न साकार करण्यासाठी अभिनयाचे क्षेत्र निवडावे. या क्षेत्रात प्रसिध्दी, पैसा व सन्मान सहज मिळतो. मात्र या क्षेत्रातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तीव्र स्वरुपाची स्पर्धा आहे. या क्षेत्रातील ग्लॅमर विद्यार्थ्यांना आकर्षित करत असते. म्हणून विद्यार्थ्यांनी हे क्षेत्र करिअरसाठी निवडावे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोर्सचे समन्वयक प्रा. डॉ.दत्तात्रय डांगे यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. डॉ.समाधान माने, प्रा.डॉ. राजाराम राठोड आदी सह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. 
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सारिका भांगे यांनी केले.शेवटी उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.रमेश शिंदे यांनी मानले. 
 
Top