कौठाळी, ( सोमनाथ लोहार )- कौठाळी ,तालुका पंढरपूर येथील भीमा नदी पात्रात शिवजयंती निमित्त प्रवीण नगरे आणि सूरज नगरे या दोन्ही बंधूंनी छत्रपती शिवरायांची अश्वारूढ तरंगती प्रतिकृती तयार केली असून पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे.


शिवजयंती निमित्त कौठाळी गावांमध्ये भीमा नदी पात्रामध्ये प्रवीण चंद्रकांत नगरे व सुरज माणिक नगरे या भोई समाजाच्या कलाकारांनी घोड्या वरती स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांची तब्बल आठ फूट उंच व सहा फूट लांबीची प्रतिकृती तयार केली आहे . अगदी हुबेहूब अश्वारूढ शिवरायाची प्रतिमा असल्यामुळे शिवराय नदीतून घोड्यावर धावले असल्याचा भास होत आहे . रिकामे पाण्याचे बॅरलच्या साह्याने नदीवर तरंगता झुला तयार करण्यात आला असून यावर अश्वारूढ शिवरायांचे स्थापना करण्यात आली आहे. भीमा नदीच्या मध्यभागी या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून शिवभक्तांना जाऊन दर्शन घेण्यासाठी होडीची सोय करण्यात आली. या होडीद्वारे शिवभक्तांना तेथे नेऊन दर्शन घडवून फेरी मारून परत आणून सोडले जात आहे 


 या उपक्रमाचे कौठाळी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे. शिवभक्तांना वाहतूक करणाऱ्या होडीना भगवे झेंडे लावून नदीच्या किनाऱ्यावरती शिवचरित्र ,पोवाडा , स्पीकरची सोय केल्यामुळे वातावरण शिवमय झाले आहे . यापूर्वीही या नगरे बंधूंनी भीमा नदी पात्रमध्ये तरंगते शिवस्मारक ,तरंगत्या रायगडाची प्रतिकृती, शिवसृष्टी साकार केली होती. त्याच बरोबर अकरा फूट उंचीचा शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बनवण्यात आला होता . कर्नाटक येथील शिवभक्तांनी त्याची प्रतिष्ठापना केली होती.  छत्रपती संभाजी राजांचाही अकरा फूट उंचीचा पुतळा बनवण्यात आला होता त्या छत्रपती संभाजी राजांच्या पुतळ्याची हैदराबाद येथे सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे . 
 पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोलेे यांनी या उपक्रमाला भेट देऊन कलाकारांचे कौतुक केले.  
 
Top