पुणे : महाराष्ट्रामध्ये उपेक्षा करुन मारणं ही लोकांची एक फार आवडती कला आहे. हीच उपेक्षा बाळशास्त्री जांभेकरांच्याही नशिबी आली. जांभेकरांचं कर्तृत्त्व महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍या तल्या मातीच्या शेवटच्या कणापर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहचवणं आवश्यक आहे. बाळशास्त्रींच्या विचारांची सूत्रं महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचली तर आधुनिक काळातली रसिकता, वाचनसंस्कृती ही सत्याच्या बाजूने झुकेल. आज काही संपादक वाटले गेले; पत्रकार वाटले गेले कारण मालक सत्ताधार्‍यांच्या खिशात जावून विकून बसले. लेखण्या विकलेल्या देशाला कुठलंही भविष्य नसतं. लेखणीचं पावित्र्य आणि लेखणीचं पातिव्रत्य शिल्लक ठेवायचं असेल तर जांभेकरांनी सुरु केलेली ही समृद्ध पत्रकारिता जी प्रामाणिक मतभेद व्यक्त करते ती सुरु ठेवली पाहिजे. असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात प्रथमच ‘बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता’ या विषयावर मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित व्याख्यानात डॉ.सबनीस बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मसाप पुणेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे होते तर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

वैचारिक मतभेदासाठी टोकाची भांडणे जरुर करा पण सत्य दाबण्यासाठी आणि सत्तेचा माज शिल्लक ठेवण्यासाठी पत्रकाराला वापरणं अशी पत्रकारिता महाराष्ट्राला परवडणारी नाही. म्हणून पत्रकारांची भूमिका शुद्ध, पवित्र होईपर्यंत ही कार्यपालिका आणि कायदेमंडळ सुधारणार नाहीत. पत्रकारांचा वचक असावा. खोट्या गोष्टीचा मोठा दणका इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडीयाच्या माध्यमातून वाजवला जातो आहे. आम्ही म्हणतो तेच खरं या पद्धतीची भांडवलशाहीला, साम्राज्यशाहीला पूरक ठरणारे परिस्थितीमध्ये सामान्य पत्रकार जो सत्यनिष्ठा जपू इच्छितो, जो आगरकर, आंबेडकरांचा वारस होऊ पाहतो, जो गांधी आणि टिळकांच्या परंपरेला न्याय देण्याची भूमिका आपल्या लेखणीच्या माध्यमातून करु इच्छितो, जो बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेच्या मूळ भूमिकेपर्यंत जावून पोहचू इच्छितो अशा प्रकारची नवी - जुनी पिढी आता मावळत चालली आहे, अशी खंतही डॉ.सबनीस यांनी व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ब्रिटीशांच्या काळातील मुंबईतील मराठी समाजाला इंग्रजी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी बाळशास्त्रींना प्रथम प्रयत्न करावे लागले. राजाराम मोहन रॉय पश्‍चिम बंगालमध्ये करीत असलेल्या स्त्रीयांविषयक व सामाजिक सुधारणा महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्राची सुरुवात केली. बाळशास्त्रींच्या पत्रकारितेचा पाया हा शिक्षण, संशोधन व जनसामान्यांच्या प्रश्‍नाकडे सामान्यांचे लक्ष वेधणे हा होता हे लक्षात येते. आजच्या पत्रकारांनी हा पाया लक्षात ठेवला तर अनेक अर्थाने मराठी वृत्तपत्रसृष्टी समृद्ध होईल.
अध्यक्षीय भाषणात प्रकाश पायगुडे म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर हे बहुआयामी पत्रकार होते. त्यांचे चार भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांना सहा परदेशी भाषा येत होत्या. कोकणातील छोट्याशा गावात जन्मलेल्या मुलाने मुंबईत जावून केलेले एवढे मोठे कार्य विलक्षण आहे.

    प्रारंभी बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस डॉ. श्रीपाल सबनीस व प्रकाश पायगुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त अमर शेंडे यांनी मानले.
यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्‍वस्त सौ,अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, म.सा.प पुणेचे दीपक करंदीकर, प्रा.तानसेन जगताप, उद्धव कानडे, वि.दा.पिंगळे, डॉ.अरविंद संगमनेरकर आदींसह वृत्तपत्र व साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.
 
Top