स्वेरीमध्ये ‘पर्यावरण युवा जागृती’ या विद्यापीठस्तरीय पथनाट्य स्पर्धा संपन्न

प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले पंढरपूरचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय


पंढरपूर- ‘पर्यावरणाबाबत केवळ सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर आणखी ३३ टक्के भूभागावर वनीकरण करण्याची अत्यंत गरज आहे. सध्या सोलापूर जिल्ह्याचा ०.२५ टक्के भूभाग तर लातूर जिल्ह्याच्या ०.१७ टक्के एवढ्याच भागात  वनीकरण आहे. यामुळे भूगर्भात पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. जर वृक्ष लागवड केली नाही तर भविष्यकाळात निसर्गाचे हे देणे लुप्त होणार आहे. म्हणून पाऊस पडण्यासाठी आणि पर्यावरण जपण्यासाठी प्रत्येकांनी झाडे लावण्याची आवश्यकता आहे. झाडे लावली तर झाडांची मुळे हे पावसाचे पाणी धरून ठेवतात त्यामुळे पर्यावरणावर कार्य करण्याची जास्त गरज आहे.’ असे मत संत तुकाराम महाराजांचे वंशज व मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे यांनी केले.

          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर, सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर, श्री विठ्ठल एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोपाळपूर, आर्ट ऑफ लिव्हींग, देवराई फाउंडेशन, तळेगाव, श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये ‘पर्यावरण युवा जागृती’ या विद्यापीठस्तरीय पथनाट्य स्पर्धेचे आयोजन केले होते. पथनाट्याचे उदघाटन विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. वसंत कोरे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे हे होते.  प्रास्तविकात प्रा. यशपाल खेडकर यांनी केले . 
उदघाटक डॉ.कोरे म्हणाले की, ‘पथनाट्यातून लोकांच्या मनाला भावणारे नाटक केले जाते. त्यामुळे यातून अधिकाधिक कला सादर केली जात आहेत त्यामुळे ही नामी संधी चालून आली असून पर्यावरणातील जागतिक पातळीवर समस्या दूर करण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची आहे. 
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील जोशी म्हणाले की, ‘पथनाट्या तून नाटक करता येत नाही परंतु वस्तुस्थितीतुन अनुभव सादर करता येतो. यातील नैसर्गिक कला प्रेक्षकांना भावते व रस्त्यावर जो यशस्वी होतो तोच पुढे रंगमंचावर आणि पुढे पडद्यावर यशस्वी होत असतो. यासाठी आपला अभिनय महत्त्वाचा आहे. पर्यावरण जागृतीचे कार्य सर्व अभियंत्यांनी करावे.’ पंढरपूर तालुका वनीकरण अधिकारी किशोर आहेर म्हणाले की, ‘ स्वेरीने पर्यावरणावर उत्तमरित्या कार्य केले असून प्रत्येक पाहुण्यांकडून वृक्षारोपण केले जात आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे.’
 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘पर्यावरण, सामाजिक वनीकरण, प्रदूषण समस्या व निसर्ग संवर्धन’ या विषयावर आयोजिलेल्या पथनाट्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषक रु.१०,०००/- व स्मृतिचिन्ह कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर , द्वितीय क्रमांकाचे रु.७०००/- व स्मृतिचिन्ह हे शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय अकलूज, तृतीय क्रमांकाचे रु.५०००/- व स्मृतिचिन्ह सांगोला महाविद्यालय सांगोला यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिक रु. १०००/- विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी यांनी मिळवले. 
 विजेत्या संघाना मंदिरे समितीच्या विशेष कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. परीक्षक म्हणून अभिनेते श्याम सावजी, डॉ. प्राजक्ता बेणारे, प्रा.शरद कावळे यांनी काम पाहिले. 
   या पथनाट्यात स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपुर व स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपुर, संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा, दयानंद महाविद्यालय सोलापूर, वालचंद महाविद्यालय सोलापूर यांनी देखील उल्लेखनीय पथनाट्ये सादर केली. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. अनिल नारायणपेठकर, विविध महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिनिधी उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, प्रा.करण पाटील, प्राध्यापकवर्ग शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
 
Top