पंढरपूर, दि.२७ :- मराठी भाषा जगवायची असेल तर प्रत्येकाने व्यवहारात मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार  व गौरव करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्राध्यापक हेमंत गव्हाणे यांनी सांगितले.

     

  मराठी भाषा दिन दरवर्षी २७ फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. पंढरपूर एस.टी.आगारा मार्फत नवीन बसस्थानकावर मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.

  

यावेळी एस.टी.महामंडळाचे विभागीय अभियंता यु.वाय. महाबळेश्वरकर, आगार व्यवस्थापक सुधीर सुतार, पत्रकार महेश भंडारकवठेकर, सत्यविजय मोहोळकर, राजेंद्र कोरके-पाटील, राजकुमार घाडगे तसेच एस.टी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.             

       यावेळी प्राध्यापक गव्हाणे बोलताना म्हणाले, मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांपुरती मर्यादित नसून जगातील अनेक ठिकाणी मराठी भाषेचा प्रसार झालेला आहे. अशा मराठी भाषेचा आपल्या सार्थ अभिमान असायला पाहिजे. मराठी साहित्यकांची पुस्तकाचे वाचन, लेखन व मनन यावर भर दिला तर मराठी किती समृध्द आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही . यावेळी मराठी साहित्याचा समृध्द वारसा जतन करण्याचे आवाहनही प्राध्यापक गव्हाणे यांनी  केले.

          मराठी भाषा संवादाची भाषा असून,एसटी महामंडळाच्या माध्यमातून हजारो प्रवाश्यांपर्यंत मराठी भाषेतील संवाद साधून, मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला जात असल्याचे आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी इंग्रजीचे ज्ञान प्राप्त करताना आपल्या मराठी भाषेचा विसर पडायला नको,असे पत्रकार सत्यविजय मोहोळकर यांनी सांगितले.

    मराठी भाषा दिना निमित्त माहिती व जनसंपर्क महासंलनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मराठी’ लोकराज्य विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बस स्थानकातील उपस्थित प्रवाश्यांचाचे गुलाब पुष्प देवून यावेळी स्वागत करण्यात आले. 

   या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्थानक प्रमुख रत्नाकर लाड यांनी केले.आभार प्रदर्शन वाहतुक निरिक्षक पंकज तोंडे केले.
 
Top