पंढरपूर - पंढरपूर येथे दि.०५ फेब्रुवारी २०२० रोजी माघी यात्रा भरत असून येणा-या लाखो भाविकांना सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली असून  यात्रेकरुंना यात्रा कालावधीमध्ये खालीलप्रमाणे सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.


नगरपरिषदेने शहरातील रस्ता दुरुस्तीची कामे तसेच संपुर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस प्रशासन व नगरपरिषद कर्मचा-यांची विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक घाटासमोर ,दर्शन बारी मार्ग, ६५ एकर मध्ये, वाखरी तळावर मेटल हायमास्ट, सोडियम व्हेपर दिवे बसविण्यात आले आहे. वाळवंटात विशेष स्वच्छता रहावी म्हणुन मंदिर समिती व  पंढरपूर नगरपरिषद कर्मचा-यांमार्फत दररोज स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच वाळवंटात उघड्यावर शौचास बसु नये म्हणुन विशेष टीम नेमण्यात आली आहे. तसेच आर.एस.डी.एफ. चे २८ जवान बोटीसह प्रत्येक घाटावर भाविकांचे जिवरक्षक म्हणुन काम पाहणार आहेत. तसेच नदी पात्र, पत्राशेड, ६५ एकर, मनिषा नगर, मंदिर परिसर दक्षिण बाजु येथे आगीची दुर्घटना होवू नये म्हणून २४ तास अग्निशमन वाहन उभे करण्यात आले आहे. शहर व मंदीर परिसरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गोपाळपुर नाका येथील पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शन द्वारे उपलब्ध करुन दिले आहे. शहरात एकुण ६५ हातपंप व १३० विद्युत पंप उपलब्ध असुन याद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत संपुर्ण शहरात विशेष: ज्या ठिकाणी मठांची संख्या जास्त आहे त्याठिकाणी पाणी पुरविण्यासाठी पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.  यात्रा कालावधीत नगरपरिषदेच्यावतीने १००० सफाई कर्मचा-यांद्वारे शहरात व उपनगरात स्वच्छता करण्यात येत आहे. यात्रा कालावधीमध्ये प्रत्येक मोठ्या मठांमध्ये स्वतंत्ररित्या कचरा साठविण्यासाठी लोखंडी बॅरेल ठेवावेत अशी सूचना मठाधीपतींना देण्यात आलेली आहे. ४३ घंटागाडीद्वारे २४ तास कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत चालू राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील ८ वाहने, २ कॉम्पॅक्टर, ३ डंपर प्लेसर, २ डंपिंग ट्रॉलिने ९० कंटेनर व इतर टॅँक्टर व टिपर १२ वाहनामार्फत  दररोज ८० ते १०० टन कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  
       ६५ एकर, वाखरी पालखीतळ ,पत्राशेड व शहरातील विविध ठिकाणी कायमस्वरूपी ४१५० शौचालय असुन तात्पुरते ५०० शौचालये बसविले आहेत.उघड्यावर शौचालये बसु नये म्हणुन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

शहरात यात्रा कालावधीमध्ये पत्राशेड दर्शनबारी, पोलीस संकुल, दर्शन मंडप, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट या ५ ठिकाणी यात्रेकरुंच्या सोईसाठी प्रथमोपचार केंद्र उघडण्यात आले आहे. तसेच यात्रा कालाधीत कॉलरा हॉस्पिटल येथे ५० कॉटचे हंगामी स्वरुपाचे संसर्गजन्य रुग्णालय स्थापित करण्यात आले आहे. शहरामध्ये प्रथमोपचार केंद्रावर १५ वैद्यकीय अधिकारी, २० परिचारीका, कर्मचारी काम पाहतील. १०८ च्या अँम्बुलन्स २४ तास कार्यरत राहणार आहे. यात्रा कालाधीमध्ये संपुर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष पंढरपूर नगरपरिषद मुख्य कार्यालय येथे  उघडण्यात आले आहे. त्याचा दुरध्वनी क्र.२२३२५३ असा आहे. नगरपरिषद टोल फ्री नंबर १८००२३३१९२३ आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्षनेते, सर्व सभापती व नगरसेवक, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील राहणार आहेत. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहरातील सर्व स्थानिक नागरीकांनी स्वच्छता व आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेचेवतीने करण्यात आले आहे.
 
Top