समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने काळाचौकी आणि धारावी पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई - ‘१५ कोटी (मुसलमान) १०० कोटींवर (हिंदूंवर) भारी असल्याचे दाखवू देऊ’, असे देशविरोधी वक्तव्य करून धार्मिक सलोखा बिघडवून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणारे ‘एम्.आय.एम्.’पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने काळाचौकी आणि धारावी येथील पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे. वारिस पठाण यांनी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील सार्वजनिक सभेत हिंदूंना दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर या तक्रारी करण्यात आल्या आहेत. न्यू परशुराम क्रीडा मंडळ (काळाचौकी), हिंदु जनजागृती समिती, वज्रदल (धारावी), श्रीराम गणेश मंदिर मित्रमंडळ (धारावी) यांच्या वतीने या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

या तक्रारीत म्हटले आहे की, यापूर्वी याच पक्षाच्या अकबरूद्दीन ओवैसी यांनी हिंदूंना १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना संपवण्याची धमकी दिली होती. सध्या देशात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यांवरून समाजात जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करण्यात येत आहे. हिंसक आंदोलने केली जात आहेत. शाहीनबाग येथे झालेल्या आंदोलनांतील भाषणांत देशविरोधी वक्तव्ये करणे, जामिया मीलिया विद्यापिठात देशविरोधी घोषणा देणे,पी.एफ.आय्.’ सारख्या जिहादी संघटनेकडून या आंदोलनांना आर्थिक साहाय्य, तसेच मनुष्यबळ पुरवणे आदी अनेक गोष्टी पुढे येत आहेत.

अशातच वारिस पठाण यांनी केलेले प्रक्षोभक वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणे अर्थात दंगल घडवणे, जमावाला गुन्हा करण्यासाठी उद्युक्त करणे, सामाजिक सखोला बिघडवून देशाचे ऐक्य आणि शांतता धोक्यात आणणे हे अनुक्रमे भा.दं.वि.१५३ (अ), ५०५(१)(ब) आणि १५३ (ब) अन्वये गुन्हा ठरतो. वारिस पठाण यांचे आक्षेपार्ह वक्तव्य यू-ट्यूब, वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आले आहे.त्याचा संदर्भ घेऊन पोलिसांनी वारिस पठाण यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.
 
Top