३ फेब्रुवारी क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा स्मृतीदिन  

उमाजी नाईक : (७ सप्टेंबर १७९१–३ फेब्रुवारी १८३२). एक प्रसिद्ध क्रांतिकारक. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी घडून आलेल्या रामोशांच्या उठावात उमाजी नाईक यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी (ता. पुरंदर) येथे झाला. वडील दादजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून काम करत होते. छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक किल्ल्यांची राखणदारी या समाजाकडे सोपविण्यात आली होती. उमाजी लहानपणापासून वडिलांसोबत पुरंदरच्या रखवालीचे काम करत. आपल्या वडिलांकडून त्यांनी गोफण चालविणे, तीरकमठा मारणे, कुऱ्हाड चालविणे, भाला फेकणे, तलवार व दांडपट्टा चालविणे इ. कौशल्ये आत्मसात केली होती. उमाजी ११ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले (१८०२) आणि वंशपरंपरेने वतनदारी त्यांच्याकडे आली.
१९ व्या शतकाच्या प्रारंभी घडून आलेल्या रामोशांच्या उठावात राजे उमाजी नाईक यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते. फाशी देण्यापूर्वी त्यांना अखेरची इच्छा विचारली तेव्हा ते त्वेषाने म्हणाले होते, ‘तुम्ही इंग्रजांनी चालते व्हावे’
इंग्रजांच्या सल्ल्यावरून १८०३ मध्ये पुरंदर किल्ला रामोशींच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न केला, यावेळी रामोशींनी कडाडून विरोध केला. त्यामुळे रामोशी लोकांचे हक्क, वतने, जमिनी जप्त केल्या. उमाजींनी या अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष केला. उमाजी उत्तम संघटक होते. रामोशी त्यांना आपला नेता मानत होते. गरिबांना लुटणारे सावकार, वतनदार व जमीनदार यांना त्यांनी आपले लक्ष बनविले. गोरगरिबांना लुटून सावकार झालेल्या मुंबईच्या चानजी मातिया या पेढीवाल्याचा माल उमाजींनी पनवेल-खालापूरजवळ धाड घालून पळविला. तेव्हा उमाजी इंग्रजांच्या हाती लागले व त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर एका दरोड्यात ते पुन्हा पकडले गेले व त्यांना सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. कैदेत असताना ते लेखन–वाचन शिकले.


उमाजीच्या सरकारला पाठिंबा द्यावा, त्यांची वतने व तनखे आपण त्यांना परत मिळवून देऊ; कंपनी सरकारच्या पायदळात व घोडदळात असणाऱ्या शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत, अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार राहावे व कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये, नाहीतर त्या गावांचा विध्वंस केला जाईल, असा इशारा उमाजींनी दिला होता. उमाजींनी आपण सर्व हिंदुस्तानसाठी हा जाहीरनामा काढला आहे, असा उल्लेख होता. संपूर्ण भारत एक देश अथवा एक राष्ट्र ही संकल्पना यामध्ये दिसून येते. तसेच यामध्ये हिंदू-मुसलमान राजे, सरदार, जमीनदार, वतनदार, सामान्य रयतेचा समावेश होता. या जाहीरनाम्या नंतर उमाजींनी ‘समस्त गडकरी नाईक’ यांना उद्देशून एक पत्रक काढले व इंग्रजाविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले.


उमाजी व त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व मराठवाड्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नेमले गेले. ८ ऑगस्ट १८३१ रोजी इंग्रजांनी आणखी एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास १०,००० रु. बक्षीस व ४०० बिघे जमीन देण्याचे जाहीर केले. या आमिषाला उमाजीचे दोन साथीदार काळू व नाना हे बळी पडले. त्यांनी उमाजींना १५ डिसेंबर १८३१ रोजी स्वत: पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यानंतर इंग्रजांनी उमाजींना पुणे येथे ३ फेब्रुवारी १८३४ रोजी फाशी दिली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून घडून आलेला हा पहिला क्रांतिकारी प्रयत्न होता. 

अशा राजे उमाजी नाईक यांचे स्मृतिदिनी विनम्र अभिवादन .
 
Top