पंढरपूर,(प्रतिनिधी)- बेकायदेशीर इमारत हस्तांतरण व मागासवर्गीय वसतिगृहीचे असुरक्षित ठिकाणी स्थलांतरण प्रकरणी सोलापूरचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कैलास आढेंच्या बडतर्फीसाठी राधेश बादले पाटील यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनावेळी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
      याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह चालविले जाते. हे वसतिगृह पंढरपूर शहराच्या सुरक्षित व मध्यवर्ती ठिकाणी अल्प भाड्याने संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळा ट्रस्टच्या इमारतीमध्ये होते. हे पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर सुरक्षित ठिकाणी असलेले शासकीय मुलींचे वसतिगृह मुलींना शाळा -महाविद्यालयांपासून सोईचे असले तरी ते सहाय्यक समाजकल्याण आयुक्त कैलास आडेंना असुरक्षित व गैरसोईचे होते, त्यामुळे त्यांनी अर्थपुर्ण व्यवहार करित, स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठी, मध्यवर्ती ठिकाणच्या सुरक्षित इमारतीच्या १० पट भाडे अदा करित, शासनाचे नुकसान करित, शहरापासून दूर असुरक्षित ठिकाणी मागासवर्गीय शासकीय मुलींचे वसतिगृह स्थलांतर करण्याचा महाप्रताप पदाचा गैरवापर करुन केला आहे.एवढ्यावरच कैलास आडें थांबले नसून विश्वस्त नसलेल्या संस्थेची इमारत वेश्या व्यवसायात असलेल्या इसमांच्या हाती सोपवून, कागदोपत्री मात्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांच्या हाती सोपविल्याचे भासवून लाखोंचा घपला केल्याचा आरोप गाडगे महाराज मराठा धर्मशाळेचे व्यवस्थापक राधेश बादले पाटील यांनी केला आहे.
      निर्भया, उन्नावसारखी प्रकरणे ताजी असताना शहरापासून दूर असुरक्षित ठिकाणी वसतिगृह स्थलांतर करण्याचे आडेंचे धाडस वाखाणण्या सारखे आहे. तसेच विश्वस्त नसलेल्या संस्थेची इमारत, विश्वस्त व व्यवस्थापक नसलेल्या अवैध धंद्यातील इसमांकडे सोपविण्याचे कैलास आडेचे धाडस निश्चितच वाखाणण्यासारखे आहे.आडेंच्या या गैरव्यवहार व गैरवाजवी धाडसास उच्चस्तरीय पाठीशी घातले जात असल्याचा आरोप राधेश बादले पाटील यांनी केला आहे. आडेंनी ट्रस्टची इमारत अवैध व्यवसाय करणारे इसमांकडे हस्तांतरीत केल्याने,या ट्रस्ट इमारतीच्या ताब्या वरुन खून होण्याची, कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून , या इमारतीमुळे खून झाल्यास, कैलास आडेंना मुख्य आरोपी करण्यात यावे, अशीही मागणी राधेश बादले पाटील यांनी केली आहे.
       मागासवर्गीय वसतिगृहाचे अर्थपुर्ण व्यवहार करित असुरक्षित ठिकाणी स्थलांतर व ट्रस्टच्या इमारतीचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण यासारखे अनेक गैरव्यवहार करुन सोलापूर येथील सहाय्यक समाजकल्याण आयुक्त कैलास आडेंनी केले असून, त्यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ताही आहे, यासाठी आडेंची सक्तवसुली संचनालय(ED), लाचलुचपत प्रतिबंधक खाते(ACB), आयकर खाते(IT) आदिंनी संयुक्तपणे वा स्वतंत्रपणे चौकशी करणे आवश्यक असून, आडेंना बडतर्फ करणे क्रमप्राप्त आहे, या मागणीसाठी अनेकवेळा राधेश बादले पाटील यांनी शासनाशी पत्रव्यवहार करुनही कारवाई न झाल्याने अर्थसंकल्पिय अधिवेशन काळात विधानभवन परिसरात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
 
Top