शेळवे, (संभाजी वाघुले)-आधी पैसे मग उपचार ही पद्धत बंद झालीच पाहिजे , फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे अशा घोषणा देत रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानाचे स्मरण करून विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे निदर्शने केली. रुग्ण हक्क संरक्षण कायदा मंजूर झाला पाहिजे, या आग्रही मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण आणि संस्थापक नेत्या अ‍ॅड. वैशालीताई चांदणे यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी झालेल्या सभेमध्ये बोलताना रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, रुग्णालयात आकारलेले दर नियंत्रित करण्यासाठी शासनाकडे कोणतीही उपाययोजना नाही,गेल्या काही वर्षांपासून आधी पैसे भरा मगच उपचार करू असे धोरण रुग्णालयांनी निश्‍चित केल्याने गोरगरीब रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. हॉस्पिटल चालकांनी वेळीच त्यांच्या पद्धतीत बदल न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. शासनाने या मागणीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले तर आम्ही आमच्या पद्धतीने हॉस्पिटल चालकांना सरळ करू.

रुग्ण हक्क परिषदेच्या संस्थापक नेत्या अ‍ॅड. वैशालीताई चांदणे म्हणाल्या की, रुग्णालये आधी पैशांची मागणी करून उपचार नाकारत आहेत, ही चुकीची बाब आहे. पैसे नसतील अशा गरीब रुग्णाला जगण्याचा अधिकारच नाही का? 

गोर-गरीब रुग्णांना वेळीच उपचार मिळाले पाहिजेत. आधी उपचार मग पैसे असा अधिनियम शासनाने त्वरित निर्गमित करावा व मनमानी करणार्‍या रुग्णालयांना काळ्या यादीमध्ये टाकून त्यांना शासनाच्यावतीने देण्यात येणारे सर्व लाभ तात्काळ बंद करावेत अन्यथा फक्त श्रीमंतांसाठीच असा बोर्ड आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर लावू.

यावेळी पुण्यासह ग्रामीण भागातील रुग्ण हक्क परिषदेचे कार्यकर्ते आणि नागरिक सामील झाले होते. या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण व संस्थापक नेत्या अ‍ॅड. वैशालीताई चांदणे यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष कय्युम पटेल, पुणे जिल्हा अध्यक्ष तेजश्री पवार, केंद्रीय सचिव दिपक पवार, राज्यसचिव संध्याराणी निकाळजे, राज्यउपाध्यक्ष डी.डी.पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सलीम आळतेकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शुभांगी साखरे, सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ. एकादशी लोंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सामील झाले होते .
 
Top