नेरळ ,ता.कर्जत- मातीला आकार हा ती घडत असतानाच द्यायला हवा त्याच पद्धतीने आजच्या युगात विद्यार्थ्यांना सुरक्षित जीवनाचे धडे महत्वाचे असून विद्यार्थी दशेतच ते त्यांना दिले गेले पाहिजे असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांनी केले आहे. कर्जत तालुक्यातील पाथरज शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत ते बोलत होते. 

     

आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्पा अंतर्गत कर्जत तालुक्यात चार निवासी आश्रम शाळा आहेत. त्यापैकी पाथरज आश्रमशाळा येथे गुरुवार २७  फेब्रुवारी रोजी १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, शुभचिंतन सोहळा आणि या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, पाथरज शाळा मुख्याध्यापक रमेश चव्हाण, पत्रकार दिपक पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

 यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जयपाल पाटील यांनी सांगितले की, आपल्या देशात वर्षाकाठी १ लाखाच्या वर अपघात होतात. या अपघातात तरुणांची संख्या लक्षणीय असल्याची बाब समोर आली आहे. त्यातही विनापरवाना गाड्या चालविणारे तरुण खूप आहेत. त्यामुळे शासनाने नियम कडक केले आहेत. तेव्हा आपल्याला वाहन चालवता येत असेल तरी परवाना मिळाल्यानंतरच वाहन चालवा. आपले जीवन अनमोल आहे. तसेच कुठेही अपघात असल्यास तसेच आपल्या घरात आजूबाजूला कुणा महिलेला प्रसूतीवेदना होत असतील तर १०८ ही रुग्णवाहिका सेवा आपल्याला शासना कडून मोफत मिळते. या रुग्णवाहिकेत एक डॉक्टर व सहाय्यक उपलब्ध असतो. त्याचबरोबर औषधें सुद्धा या रुग्णवाहिकेत उपलब्ध करून देण्यात आलेली असतात. यासह आज मराठी भाषा दिन असल्याने त्यांनी सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

 यावेळी उपस्थित नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, आजच्या काळात महिलांवरील घडत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभमीवर महिलांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे. पोलीस विभाग सक्षम आहेच पण त्यासोबत महिलांनी सुद्धा आपण अबला नसून सबला आहोत हे दाखवून दिले पाहिजे. आम्ही शाळांमध्ये पोलीस काका व पोलीस मावशी ही संकल्पना सुरू केली आहे. आपल्याला शाळेत किंवा घरी जाताना कुणी छेडछाड करत असेल तर निसंकोच पणे पोलिसांना या गोष्टीची माहिती द्या. जर आपल्याला भीती वाटत असेल तर शाळेत आपण तक्रार पेटी सुरू केली आहे. त्यामध्ये आपण तक्रार लिहून टाकू शकता. आपले नाव नाही टाकले तरी चालेल. आम्ही त्यावर त्वरित कारवाई करू. महिला मुली सशक्तीकरणासाठी आम्ही प्रशिक्षित ब्लॅक बेल्ट महिलांना शाळेत आणून त्यांच्याकडून मुलींसाठी प्रशिक्षण आयोजित करणार आहोत. आपल्या आयुष्यात धेयनिश्चिती गाठताना आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा .  
 
Top