मुंबई ,दि.१७ -  भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणावरून जाहिररीत्या महाविकास आघाडी सरकारमधील वाद चव्हाट्यावर आले असून असे नेहमी वाद होत राहतील. अशा वादांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालविणे अवघड राहील.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाकारून भाजप आरपीआयच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावे त्यासाठी आता योग्य वेळ आली आहे,असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे. 

भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषदचा तपास एनआयएकडे देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य आहे. या निर्णयाबद्दल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतो असे ना. रामदास आठवले म्हणाले. 

केंद्र सरकारला चौकशीसाठी एनआयए ला नियुक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र भिमा कोरेगाव  प्रकरणाचा तपास एनआयए कडे देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर विरोध केला आहे. राज्य सरकारमधील कोणताही निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. त्याला जाहीर विरोध होणे योग्य नाही.सरकारने अंतर्गत बैठक घेऊन विचारविनिमय करून निर्णय घेतले पाहिजेत. त्यावरून जाहीररीत्या वाद घालणे योग्य नाही. भिमा कोरेगाव प्रकरणी तपास एन आय ए कडे देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केलेला जाहीर विरोध त्यातून होणारे जाहीर वाद योग्य नाही. असे वाद विवाद होत राहिले तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना सरकार चालविणे कठीण जाणार आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारून भाजप आरपीआय चा पाठिंबा घेऊन स्थिर सरकार स्थापन करावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.
 
Top