हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम
मुंबई - २६ जानेवारी निमित्त बाजारात अशोक चक्राचे चित्र असलेले तसेच राष्ट्रध्वजाप्रमाणे तिरंगी रंगाचे टी शर्ट विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे लक्षात आले. अशा प्रकारच्या टी शर्टची विक्री करणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. अशा प्रकारे होत असलेला राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावतीने २५ जानेवारी यादिवशी भांडुप येथील पोलीस ठाण्यात निवेदन दिले. या निवेदनानुसार भांडुप पोलिसांनी कारवाई करत दुकानदारांना कह्यात घेऊन आक्षेपार्ह माल जप्त केला.

समितीचे सतीश सोनार, व्रजदल संघटनेचे अध्यक्ष संजय चिंदरकर आणि पदाधिकारी विमल जैन यांनी शाहूनगर, धारावी पोलीस ठाणे येथे या विरोधात निवेदन दिले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन पालवे यांनी स्वत: हिंदुत्वनिष्ठां सह जाऊन दुकानदारांना कह्यात घेतले. या कारवाईमध्ये येथील ‘फॅन्सी कलेक्शन’ या दुकानासह अन्य ३ दुकानांतील आक्षेपार्ह टी शर्ट जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या दुकानदारांचा जबाब नोंदवून त्यांना ताकिद देऊन सोडून देण्यात आले. दहिसर येथेही काही दुकानामध्ये राष्ट्रध्वजाच्या रंगातील टी शर्ट, फेटे यांची विक्री करण्यात येत होती. याविषयी समितीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दहिसर (पूर्व) पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेता ध्वजसंहितेचे पालन करत, राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यायला हवी. या दृष्टीने हिंदु जनजागृती समिती प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ ही मोहीम देशभरात राबवते. याअंतर्गत कोणी राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये, इतर कोणी करत असल्यास त्यांनाही त्याची जाणीव करून द्यावी. कोणीही चेहर्‍यावर, कपड्यांवर राष्ट्रध्वजाच्या रंगात रंगवून घेऊ नयेत; राष्ट्रगीत चालू असतांना उभे राहून त्याचा सन्मान करावा; राष्ट्रध्वज उंच ठिकाणी फडकवा अशा प्रकारचे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top