पंढरपूर- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील युवकांसाठी दरवर्षी २ कोटी युवकांना नोकरी देणार असल्याची घोषणा केलेली होती. ती अपयशी ठरल्यामुळे केंद्र सरकारने आपले अपयश झाकण्यासाठीच एनआरसी आणि सीएएचा कायदा आणलेला आहे.सध्या देशाला एनआरसीची गरज नसून एनआरयूची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाविरूध्द व युवकांना रोजगार मिळण्यासाठी सोलापूर जिल्हाभर युवक कॉंगे्रसच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
"युवकांना एनआरसी नव्हे तर एनआरयूची गरज" 
सध्या देशातील नागरिकांना महत्वाचा प्रश्न हा एनआरसी नसून एनआरयू आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आपले रोजगार निर्मितीचे अपयश झाकण्यासाठी एनआरसी व सीएए सारखे कायदे केलेले आहेत. त्या विरूध्द लवकरच युवक कॉंग्रेसच्यावतीने सोलापूर जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येणार असून युवकांना एनआरसी नव्हे तर एनआरयूची गरज असल्याची प्रतिक्रीया जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी दिली.
सध्या देशातील युवकांसाठी नोकरीची गरज असल्यामुळे त्यांच्यासाठी नवनवीन योजना राबवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे असताना केंद्रातील मोदी सरकार केवळ आपले अपयश झाकण्यासाठी एनआरसी व सीएए सारखे कायदे आणून देशातील नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहे. केंद्र सरकारमध्ये एकूण ३८.०२ लाख पदे मंजूर असून त्यातील ६.८३ लाख पदे रिक्त आहेत. यावरूनच मोदी सरकार बेरोजगार युवकांसाठी किती लक्ष देते हे स्पष्ट होते. सध्या कार्पोरेट क्षेत्रात सुध्दा मोठ्या प्रमाणात मंदी आली असून वाहन क्षेत्रात गेल्या ४ महिन्यात ३.५ लाख लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या कारभाराविरूध्द सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेस आंदोलन करणार असून एनआरसीऐवजी युवकांसाठी तात्काळ राष्ट्रीय बेरोजगार नोंदणी (एनआरयू) सुरू करावी तसेच युवक कॉंग्रेसच्या एनआरयू याला समर्थन देण्या साठी 8151994411 हा टोल फ्री नंबर खुला केला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी दिली.

 
Top