शेळवे,(संभाजी वाघुले)- शिरूर भागातील ग्रामीण वाडीवस्ती वरील, इंडस्ट्रीयल भागातील कामगार, आर्थिक दुर्बल घटकातील गरीब नागरिकांना अवघ्या दहा रुपयांत उपचार देणारे पाच दवाखाने शिरूर तालुक्यात प्रजासत्ताक दिनी सुरू करण्यात आले. या पाचही दवाखान्याचे उद्घाटन रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. रांजणगाव येथील मोरया क्लिनिक,शिरूर येथील यश क्लिनिक,सणसवाडी येथील साईप्रेरणा हॉस्पिटल, कारेगाव येथील श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. या पाचही हॉस्पिटल मध्ये नागरिकांना अवघ्या दहा रुपयात तपासणी, औषध - इंजेक्शन आणि प्राथमिक स्तरावरील उपचार यामध्ये मिळणार आहेत.
     यावेळी डॉ.संकेत मुटकुळे,डॉ.अमोल डकमले, डॉ. महेश पाटील,डॉ.पडवी,डॉ.साखरे यांनी दहा रुपयांत औषध उपचार ही संकल्पना आम्ही राबविण्यास कायम तत्पर राहू असे सांगितले.  
    रुग्ण हक्क परिषदेच्या शिरूर तालुका कमिटीने प्रजासत्ताक दिनी या पाचही दवाखान्यांचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिरूर तालुका अध्यक्ष दीपक फलके, कार्याध्यक्ष सुरेश गाडेकर, शिरूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष सविता बोरुडे, शिरूर शहराध्यक्ष अनघा पाठक यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. 
    यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना या पाच दवाखान्यात उपचार मिळतील, शिवाय आणखी दवाखाने निर्माण करण्याचे काम सुरूच राहील. गंभीर आजार आणि शत्रक्रियासाठीही आपले स्वतःचे हॉस्पिटल निर्माण करू. यात सर्व प्रकारचे उपचार आणि शस्त्रक्रिया दहा हजार रुपयांत करण्याचा विचार आहे.
       रुग्ण हक्क परिषदेकडे होत असलेल्या विविध मागण्या पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
Top