अलिबाग - आपल्या व कुटुंबियांसाठी बाजारातून फळे घेताना त्याची तेथेच चव न घेता ती घरी आणून मिठाच्या पाण्याने स्वच्छ करुनच खावीत अन्यथा कॅन्सरसारख्या भयंकर रोगाला सामोरे जावून आपली सुरक्षा धोक्यात येवू शकते. तेव्हा काळजी घ्या असे आवाहन आदर्श पतसंस्थेने आयोजित केलेल्या आपत्ती व सुरक्षा शिबिरात रायगड भूषण आपत्ती तज्ञ जयपाल पाटील यांनी केले. 

(छाया-विकास रणपिसे)

व्यासपिठावर संस्थेचे तज्ञ संचालक सुरेश गावंड, व्हा. चेअरमन सतिश प्रधान, संचालक विजय पटेल, जयपाल पाटील उपस्थित होते. प्रारंभी सरव्यवस्थापक अजय थळकर यांनी जयपाल पाटील यांचा परिचय करुन देवून त्यांनी संपूर्ण भारतात ५० हजार नागरीकांना सुरक्षेचे धडे दिले असल्याने आमच्या संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील यांनी आमच्या सर्व शाखांतील १०० कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली. पतसंस्थेतर्फे जयपाल पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व्हा. चेअरमन सतिश प्रधान यांनी देवून सन्मान केला. 

यावेळी जयपाल पाटील यांनी आपली कुटुंबियांची आणि इतरांची अपघातप्रसंगी, साप-विंचू दंश झाल्यावर, मोबाईलचा वापर वाहने, घरातील वीजेची उपकरणे यांच्या सुरक्षेबाबत माहिती दिली आणि प्रात्यक्षिके दाखविली. फळांबाबत द्राक्ष खरेदी करताना रस्त्यावर आपण तेथेच चव पाहातो त्यामुळे महाराष्ट्रातील ३० टक्के लोकांना आतड्यांचे कॅन्सर झाल्याची माहिती टाटा रिसर्च कॅन्सर सेंटरने दिली आहे. त्याचबरोबर केळी, आंबे व इतर फळे खातानाही काळजी घ्यावी असे सांगितले. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अलिबाग पोलिस ठाण्याचे दामिनी पथक उपस्थित राहून कांबळे हवालदार यांनी माहिती दिली. तर अपघात प्रसंगी १०८ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावयाचा यासाठी त्यांना कॉल करताच त्याचे प्रात्यक्षिक डॉ.पांडे यांनी दिले. एखाद्याचा वाहन अपघात झाला तर रायगड वाहतुक पोलिसांना कसे पाचारण करावयाचे याचे प्रात्यक्षिक देताना रायगड जिल्हावाहतूक शाखेकडून हवालदार शाम म्हात्रे यांनी येवून आपण दुसऱ्याला कशी मदत करू शकतो याची माहिती दिली. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा आपत्ती २००५ च्या कायद्याची माहिती देवून रायगड जिल्हा पोलिस प्रमुख अनिल पारसकर, अलिबाग पोलिस ठाण्याचे कोल्हे, १०८ रुग्णवाहिकेचे बी.व्ही.जी. कंपनीचे प्रमुख हणुमंतराव गायकवाड, रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पो.नि. सुरेख वऱ्हाडे आणि आदर्श पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील व संचालक यांचे आभार जयपाल पाटील यांनी मानले. 

शेवटी शिबिराबद्दलचे आपले मत बँकेचे कर्ज विभागाचे अधिकारी सुभाष माळी यांनी मांडले.
 
Top