पंढरपूर– शहरात उद्भवलेल्या  डेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रण आणण्यासाठी येथील जवळपास २५ हजार घरांचे सर्व्हेेक्षण व तपासणी करण्यासाठी येथील महाविद्यालयांमधील एक हजार विद्यार्थी नगरपरिषदेला सहकार्य करणार असून त्यांना विद्यार्थी आरोग्य मित्र म्हणून तयार केले जात आहे. येत्या सोमवारी २५ रोजी एकाच वेळी शहरातील सर्व मालमत्तांमध्ये पाणी साठ्यांची तपासणी तसेच अळी शोध व नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे. 
याबाबत आज नगरपरिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांनी नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. 
 

यात नगरपालिकेकडील कमी मनुष्यबळाचा विषय चर्चेत आला होता. यावर तोडगा म्हणून स्वेरी, कर्मयोगी, सिंहगड, उमा, कर्मवीर व विवेक  वर्धिनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आरोग्य मित्र म्हणून बरोबर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत त्यांना सर्व माहिती दिली जाणार आहे. 
 

या महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आजच्या बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. ज्याप्रमाणे पोलीस मित्र ही संकल्पना राज्यात राबविली जात आहे त्याच धर्तीवर पंढरीत आरोग्य मित्र ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.
 

 शहरात डेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रणासाठी धुराळणी, फवारणी केली जात आहे. तसेच दुषित पाणीसाठेही नष्ट केले जात आहेत. आजच्या बैठकीस नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, नगरपालिका पक्ष नेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेविका सुप्रिया डांगे, नगरसेवक विशाल मलपे, सुजित सर्वगोड ,श्रीनिवास बोरगावकर, आदित्य फत्तेपुरकर, नवनाथ रानगट,अमोल डोके, देवेंद्र शिंदे, संतोष पवार ,नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी संग्राम गायकवाड, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे ,नागनाथ तोडकर ,मलेरिया पर्यवेक्षक धर्मांण्णा गजाकोश आदी उपस्थित होते मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , नगरसेवक तसेच अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी सर्व नागरिकांनी घरी आलेल्या स्वच्छता मित्रांकडून आपले सर्व पाणीसाठे तपासून घ्यावेत व नगरपरिषद सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
 
Top