पंढरपूर (प्रतिनिधी) - गोविंदपूर्‍यातील श्रीदासगणुमहाराज यांचा वाडा ‘दामोदराश्रम’ येथे प. पू. स्वामी वरदानंद भारती यांच्या प्रेरणेने सुरु झालेला, संस्कृती संरक्षण व संवर्धनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संतकवी श्री दासगणु महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ दिला जाणारा यावर्षीचा एक लक्ष रुपयांचा पुरस्कार वारकरी संप्रदायाचे मुखपत्र असलेल्या सा. पंढरी संदेशला अध्यक्षा कल्याणीताई नामजोशी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ईशवंदन श्री. प्रभाकरमहाराज आजेगांवकर यांचे होऊन श्री पांडुरंगाचे आशिर्वाद ह.भ.प. अनिलकाका बडवे यांनी तर श्रीरुक्मिणी मातेचे आशिर्वाद भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी दिले. श्रीदासगणूमहाराज पुरस्कारा-बाबतची भूमिका महेशमहाराज आठवले यांनी विषद केली
भागवताचार्य श्री. वा. ना. उत्पात यांनी सा. पंढरी संदेशचा परिचय करुन दिला. त्यात त्यांनी आजपर्यंत लाभलेल्या संपादक मंडळींचा, पंढरी संदेशने केलेल्या धर्मकार्याचा, अविरत सुरु असलेल्या संतसेवेचा तसेच  गजाननराव बिडकर यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.
तद्नंतर पारितोषिक वितरणात- दहावीमध्ये पुणे विभागात प्रथम आलेल्या सांगोला विद्यामंदिर येथील कु. श्रृति विवेकानंद विभूते व लातूर विभागात प्रथम आलेल्या केशवराज विद्यालयातील अभिषेक संतोष जाधव या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
संतकवी श्रीदासगणु महाराज पुरस्कार सा. पंढरी संदेशकरिता गजाननराव बिडकर यांना प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणीताई नामजोशी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.  गजानन बिडकर यांनी आपले मनोगतात- आजोबा धर्मभूषण गोविंद बिडकर,  पितृचरण पंढरीनाथ बिडकर, विद्यागुरु माझे चुलते गोपाळराव बिडकर, नारायणराव बिडकर यांनी घालून दिलेल्या मार्गाने सा. पंढरी संदेशची ही सुवर्ण महोत्सवी वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. संतकवी श्रीदासगणु महाराज पुरस्कार दिल्याबद्दल साप्ताहिक पंढरी संदेश त्यांचा ऋणी असल्याचेही ते आपले मनोगतात म्हणाले.
समारोपीय भाषणात कल्याणीताई नामजोशी यांनी श्रीसंत दासगणुमहाराज यांच्या जन्मभूमीत हा पुरस्कार वितरण सोहळा होत असल्याचे सांगून पंढरी संदेशच्या कार्याची प्रशंसा केली.
   माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल गजाननराव बिडकर यांचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि आयोजकांनी पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. अरुण परळीकर यांनी आभार मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव खिरे यांनी केले.
 
Top