पंढरपूर : शिवभक्त प्रतिष्ठान, पंढरपूर यांनी दीपावलीनिमित्त आयोजित केलेल्या किल्ला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश देवडीकर, विद्याधर भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी निशांत नळे, सुधीर घोडके, अमोल दाभाडे, सारंग कुंभार, कुलकर्णी, जालिंदर सगर आदी उपस्थित होते.
    या स्पर्धेत सुमारे १०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये लहान व मोठा गट अशी विभागणी करण्यात आली होती. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे, नवनिर्मितीला चालना, इतिहासाचे स्मरण होण्यासाठी व किल्ला संस्कृती टिकवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
या वर्षी लहान गटातून समर्थ तावसकर याने बनविलेल्या पन्हाळगडास प्रथम क्रमांक, गणेश सातारकर याने बनविलेल्या तिकोना किल्ल्यास द्वितीय पारितोषिक, साक्षी भिंगे हिने बनविलेल्या पन्हाळगडास तृतीय पारितोषिक, वरद बडवे याच्या पन्हाळगड किल्ल्यास तर मल्हारगड बनविलेल्या ओंकार गुज्जलवार यास उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.
मोठ्यात गटात अभिषेक कुलकर्णी याने बनविलेल्या कुलाबा किल्ल्यास प्रथम, ज्ञानेश्वर कुंभारच्या बानकोट किल्ल्यास द्वितीय, श्वेता घाडगेने बनविलेल्या राजगड किल्ल्यास तृतीय पारितोषिक, तर ऐश्वर्या कुलकर्णी- लोहगड व प्रथमेश पालकर याने साकारलेल्या प्रताप गडास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
या पारितोषिक समारंभाप्रसंगी गणेश देवडीकर याने प्रतापगड साकारल्याबद्दल ‘हिरोजी इंदुरकर पुरस्कारा’ने, महेश तमखाने यास अजिंक्या तारा किल्ला बनविल्याबद्दल ‘दुर्गामित्र गो.वि. दांडेकर पुरस्कार, तर संदिप मोहितेंनी राजगड साकारल्याबद्दल ‘दुर्गतज्ञ घाणेकर’ पुरस्कार, ज्ञानेश्वर बोंबलेकर यांनी ‘विजयदुर्ग किल्ला’ साकारला त्याबद्दल ‘दुर्गमहर्षी प्रमोद भांडे पुरस्कार’, नेहा आसबेच्या साकारलेल्या तोरणा किल्ल्यास विशेष गौरवार्थ, क्षितिजा पेठकरने साकारलेल्या सिंडगडास विशेष गौरवार्थ सन्मानित करण्यात आले. प्रमाणपत्र व ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवभक्त प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
 
Top