पंढरपूर (प्रतिनिधी) -  यात्रा कालावधीत पंढरपूरातील होडी-चालक मालकांनी आपल्या होड्या या कालावधीत बंद ठेवून भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. होडी चालक मालक कल्याणकारी संघाचे गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.कार्तिकी यात्रा कालावधीत चंद्रभागेचे पात्र दुथडी भरुन वाहत आहे. अशा परिस्थितीत वारीनिमित्त आलेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न महत्वाचा आहे. चंद्रभागेच्या पात्राची वाढती पाणी पातळी व प्रशासनावर भाविकांच्या सुरक्षिततेचा असलेला प्रचंड ताण लक्षात घेवुन होडी चालक मालक कल्याणकारी संघाकडून हा अतिशय महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

यात्रा कालावधीमध्ये सर्व होड्या बंद असतील परंतु आदिवासी महादेव कोळी समाजातील सर्व होडी चालक चंद्रभागेच्या तीरावर ‘सुरक्षा रक्षक’ म्हणुन कामगिरी बजावणार आहेत. यासाठी २०० स्वीमर आपापल्या होड्या घेवून चंद्रभागेच्या काठावर व नदीपात्रात तैनात राहणार आहेत. यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास याची मदत वारकरी भाविकांसह प्रशासन यंत्रणेला होणार आहे. मंदिर समितीच्यावतीने सर्व स्वीमर यांना लाईफगार्ड जॅकेट आणि विशेष गणवेश देण्यात आला आहे. 

होडी चालक मालक कल्याणकारी संघाचे पदाधिकारी व मंदिर समितीचे अधिकारी, पोलिस प्रशासकीय अधिकारी यांच्यात मिटींगमध्ये  हा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे, श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्य. अधिकारी विठ्ठल जोशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बढे, पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे आदींसह होडी चालक मालक संघाचे सतीश नेहतराव, गणेश अंकुशराव, उत्तम परचंडे, गणेश तारापूरकर, रमेश नेहतराव, बाबासाहेब अभंगराव, बाळासाहेब अभंगराव, अरुण नेहतराव, मारुती करकमकर, चंद्रकांत अभंगराव, विठ्ठल अंकुशराव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
Top