पंढरपूर दि. २१ :- डेंग्यूसह इतर साथीच्या आजारामुळे पंढरपूर शहरात तसेच ग्रामीण  भागात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहून, डेंग्यू  रोगासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार भारत भालके यांनी दिल्या.

डेंग्यू आजाराबाबत उपाययोजना करण्याससंदर्भात  शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीस प्रांतधिकारी सचिन ढोले, तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उप जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, न.पा.चे आरोग्य अधिकारी डॉ.संग्राम गायकवाड  आदी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत आमदार भारत भालके बोलताना म्हणाले, डेंग्यूसह साथीच्या आजारांच्या रुग्णाचे प्रमाण वाढत असून, आरोग्य विभागाने औषधाचा मुबलक प्रमाणात साठा ठेवावा.  आजारांबाबत नागरीकांत जनजागृती करावी. तसेच धूर फवारणी करण्यात यावी. नगपालिका हद्दीतील रिकाम्या असणाऱ्या  जागेमधील जुने टायर  तसेच डासांची पैदास होईल असे साहित्य पडले असतात, अशा जागा मालकांना नगरपालिकेने सूचना द्याव्यात. डेंग्यू आजारावर मात करण्यासाठी नागरीकांनी दक्षता बाळगावी व आरोग्यविभागच्या यंत्रणेला सहकार्य करावे अशा सूचनाही आमदार भालके यांनी यावेळी दिल्या.

डेंग्यू सदृश्य आणि डेंग्यूबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करावी. शहरातील धर्मशाळा, मठ, महाविद्यालये या ठिकाणी धूर फवारणी करुन डेंग्यू बाबत प्रतिबंधात्मक उपयायोजना कराव्यात असे  प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी बैठकीत सांगितले. तसेच आरोग्य विभागाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणक करावी तसेच  स्वंयसेवी संस्था, शालेय विद्यार्थी यांना सहभागी करावे.  डेंग्यू आजाराबात रक्त नमुने तपासणाऱ्या खासगी दवाखाने व पॅथालॉजी यांनी शासन नियमानूसार रक्त तपासणी  फी रुग्णांनकडून घ्यावी अन्यथा नियमानुसार  योग्यती कारवाई करण्यात येईल असेही प्रांतधिकारी ढोले यांनी बैठकीत सांगितले.

    यावेळी बैठकीत मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी नगपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाय योजनेची माहिती दिली.तसेच प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी  किटक सर्वेक्षण, औषधसाठा ,साधन सामग्री, धुर फवारणी, रक्त नमुने, जनजागृती आदी बाबत माहिती दिली. तर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.ढवळे यांनी डेग्यू रोगासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची माहिती दिली.

 
Top