पंढरपूर दि २६:- आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रगती झाली असली तरी रक्ताची गरज रक्तदान केल्याशिवाय पुर्ण होत नाही. मानवी रक्ताला पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करणे हे माणसूकीचे आद्य कर्तव्य आहे, असे जिल्हा न्यायाधीश सी.एस.बाविस्कर यांनी सांगितले.
     

 शहीदांच्या स्मरणार्थ  तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर व ब्लड बँक पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, वीर पिता मुन्नागिर गोसावी, तालुका पोलिस निरिक्षक किरण अवचर,तालुका पोलिस निरिक्षक प्रशांत भस्मे, पंढरपूर ब्लड बँकेचे प्रसाद खाडीलकर, स्वेरीचे प्राध्यापक मुकुंद पवार , एकशेचौदा वेेेळा रक्तदान केेेलेले रविंद्र भिंगे आदी उपस्थित होते.

  यावेळी  जिल्हा न्यायाधीश  बाविस्कर बोलताना म्हणाले, जातपात धर्मच्या नात्यापेक्षा एक नाते पुढे आहे ते म्हणजे माणसुकीचे नाते. त्याचप्रमाणे रक्ताच्या नात्यापेक्षा रक्तदानाचे कार्य मोठे आहे. रक्तदात्याला  माहित नसते  आपले रक्त कुणाला  व कोणत्या जातीच्या तसेच धर्माच्या माणसाला जात आहे.रक्तदानामुळे हजारो जणांचे प्राण वाचतात. भारत देशाच्या संविधान दिनी मुंबई शहरावर २६ नोव्हेबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना शहीद झालेल्या जवानांची स्मृती जागवणे गरजचे आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस दल सतत कार्यरत असते असेही जिल्हा न्यायाधीश बाविस्कर यांनी सांगितले.


     उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे बोलताना म्हणाले, मुंबई शहरावर २६ नोव्हेबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची स्मृती जागवण्यासाठी शहिदांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करणे प्रत्येक नागरीकांचे राष्ट्रीय कर्तव्य असून नागरीकांनी रक्तदान करावे असे आवाहन केले.

     रक्तदानाव्दारे सामाजिक ऐक्याची भावना दृढ होते. समाजाठी, समाजातील लोकांसाठी काही तरी करण्याची  भावना प्रत्येकाने मनात बाळगली पाहिजे. समाजात रक्ताचे निर्माण  करण्यासाठी रक्तदान करावे. रक्तदान केल्याने विविध विचारांच्या व धर्माच्या लोकांसोबत आपले नाते निर्माण होते असे मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी यावेळी सांगितले.


   यावेळी संविधान दिनानिमित्त उपस्थितांनी  संविधानाची शपथ घेतली. तसेच या कार्यक्रमा प्रसंगी रक्तदात्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी,रक्तदाते उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पोलिस गजानन माळी, श्रीराम ताठे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकार्यांनी प्रयत्न केले.    
 
Top