नवी दिल्ली - उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्रातील एकूण आठ संस्थांना  केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात आज ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार -२०१९ ’ चे वितरण करण्यात आले. मंत्रालयाचे सचिव डॉ. के.पी. कृष्णनन, सह सचिव ज्योत्स्ना सिटलींग आणि दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की)चे संस्थापक मिलींद कांबळे यावेळी मंचावर उपस्थित होते. 


देशातील प्रतिभावान युवा लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार’ अंतर्गत आज एकूण चार श्रेणींमध्ये देशातील ३६ संस्थांना सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील एकूण ८ संस्थांचा समावेश आहे.

या पुरस्कारांना ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन श्रेणींमध्ये विभागण्यात आले होते. पुण्यातील लोहगाव परिसरातील ‘अर्ली फुड्स प्रा.लि.’ चा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक शालिनी कुमार आणि विजयालक्ष्मी नागराज यांनी हा पुरस्कार स्वीकारला.२०१६ मध्ये स्थापन झालेली ही संस्था मुलांसाठी ऑर्गनिक बिस्कीट तयार करते.
    नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील ‘क्रांतीज्योती महिला बचत गटाला’ सन्मानित करण्यात आले. बचत गटाच्या दीपा चौरे, अरुणा खडसे आणि अंजुमन शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. २०१२ पासून कार्यरत या बचत गटाच्या माध्यमातून कापडी पिशव्या बनविल्या जातात.

 सातारा जिल्ह्यातील पाचगणी नजीकच्या देवरी गावातील ‘देवरी कला गाव’ या संस्थेला सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक मंदाकिनी व अतुल माथुर, सुरेश पुंगटी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. २००९ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने स्थानिक आदिवासींच्या कला व संस्कृतीची जोपासणा केली आहे. 

नवी मुंबई येथील ‘लेटस् कँप आऊट कँप ग्राऊंड प्रा.लि.’ चा सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अभिजीत आणि मंगला म्हात्रे यांनी पुरस्कार स्वीकारला. २०१० मध्ये स्थापना असलेल्या संस्थेने मोठ्या शहरानजिकच्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या शेतावर उत्तम नियोजनबध्द मनोरंजन पार्क उभारून देत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वर्धा येथील ‘ग्लोबल एंटरप्रायजेसचाही’ यावेळी सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक बलवंत ढगे यांनी पुरस्कार स्वीकारला. २०१२ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून खादी कापडांचा उद्योग सुरु केला आहे. 
नाशिक येथील ‘स्त्री स्वाभिमान सॅनिटरी नॅपकीन निर्मिती युनिटचाही’ यावेळी सन्मान करण्यात आला.दिव्यांग असूनही समाजसेवेच्या प्रेरणेने २०१६ मध्ये ही संस्था स्थापन करणारे रवींद्र सुपेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या संस्थेने बायोडीग्रेडेबल आणि रासायनिक द्रव्यांचा उपयोग न करता व स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करत आहेत .

ठाणे पश्चिम येथील ‘स्काऊट माय ट्रिप’ या संस्थेला सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक विनीत राजन आणि दीपक अनंथ यांनी पुरस्कार स्वीकारला. पर्यटकांना विविध सोयी उपलब्ध करून देणारी ही संस्था २०१६ मध्ये स्थापन झाली आहे. 

पुणे येथील पाषाण भागातील ‘व्हेंचर सेंटर’ या संस्थेचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या नुरेल पेझारकर आणि डॉ. रेणुका दिवाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

‘अ’ श्रेणीतील पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे  तर ‘ ब’ श्रेणीतील पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे. २०१६ पासून दरवर्षी ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार’ प्रदान करण्यात येतात.
 
Top