पंढरपूर नगरपरिषदेची कार्तिकी यात्रेसाठी यंत्रणा सज्ज

पंढरपूर येथे दि.८ नोव्हेंबर २०१९ रोजी कार्तिकी यात्रा भरत असून येणा-या लाखो भाविक वारक-यांना सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली असून  यात्रेकरुंना यात्रा कालावधीमध्ये सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.

नगरपरिषदेने प्रदक्षिणा रस्त्याचे व शहरातील रस्ता दुरुस्तीची कामे यात्रेपुर्वी केली आहेत. चंद्रभागा वाळवंट तसेच संपूर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असुन अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस प्रशासन व नगरपरिषद कर्मचा-यांची विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या नदी पात्रात पाणी असल्याने प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर मोठ्या प्रमाणात मेटल हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. वाळवंटात विशेष स्वच्छता रहावी म्हणुन पंढरपूर नगरपरिषद कर्मचा-यांमार्फत दररोज स्वच्छता करण्यात येत आहे. वाळवंटात उघड्यावर शौचास बसु नये म्हणून विशेष टीम नेमण्यात आली आहे. आर.एस.डी.एफ.चे ३२ जवान ४ बोटीसह प्रत्येक घाटावर भाविकांचे जिवरक्षक म्हणुन काम पाहणार आहेत. आगीची दुर्घटना होवु नये म्हणुन २४ तास अग्निशमन वाहन उभे करण्यात आले आहेत. शहर व मंदीर परिसरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गोपाळपूर नाका येथील पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शन द्वारे उपलब्ध करुन दिले आहे. नगरपरिषदेच्यावतीने १२०० सफाई कर्मचा-यांद्वारे शहरात व उपनगरात स्वच्छता करण्यात येत आहे. ५५ घंटागाडीद्वारे दिवसा व रात्री २४ तास कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत चालु  राहणार आहे. 
  ६५ एकर, वाखरी पालखीतळ ,पत्राशेड व शहरातील विविध ठिकाणी कायमस्वरूपी ४१५० शौचालय असुन तात्पुरते ५०० शौचालये बसविण्यात आले आहेत.

शहरात यात्रा कालावधीमध्ये पत्राशेड दर्शनबारी, पोलीस संकुल, दर्शन मंडप, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट या ५ ठिकाणी यात्रेकरुंच्या सोईसाठी प्रथमोपचार केंद्र उघडण्यात आले आहे. यात्रा कालाधीत कॉलरा हॉस्पिटल येथे ५० कॉटचे हंगामी स्वरुपाचे संसर्गजन्य रुग्णालय स्थापित करण्यात आले आहे. शहरामध्ये प्रथमोपचार केंद्रावर १५ वैद्यकीय अधिकारी, २० परिचारीका, कर्मचारी काम पाहतील. तसेच १०८ च्या अँम्बुलन्स २४ तास कार्यरत राहणार आहे. यात्रा कालाधीमध्ये संपुर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष पंढरपूर नगरपरिषद मुख्य कार्यालय येथे  उघडण्यात आले आहे. त्याचा दुरध्वनी क्र.२२३२५३ असा आहे. नगरपरिषद टोल फ्री नंबर १८००२३३१९२३ आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्षा लतिका डोके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्षनेते, सर्व सभापती व नगरसेवक, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यात्रा कालावधीमध्ये शहरातील सर्व स्थानिक नागरीकांनी स्वच्छता व आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे अवाहन नगरपरिषदच्यावतीने करण्यात आले आहे.
 
Top