पंढरपूर ,दि.१७ - दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी अडचणी येऊ नयेत यासाठी  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशा नुसार आवश्यक उपयोजना करुन सुविधा उपलब्ध करुन द्या अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

      

    विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी २५२ पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पंढरपूर शहारातील कवठेकर प्रशाला, लोकमान्य विद्यालय तसेच शासकीय गोदाम येथील स्ट्रॉग रुम व मतमोजणी केंद्राला भेट दिली. तदनंतर प्रांत कार्यालय, पंढरपूर  येथे बैठकीचे आयोजन करण्यात होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र  भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, उपआयुक्त जयंत पिंपळगांवकर, प्रांतधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.वैशाली वाघमारे, स्वनिल रावडे , गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, न.पाचे मुख्यअधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.

         विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर बोलताना म्हणाले,  दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केंद्रीय  निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. यासाठी मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व्हील चेअर्स व  रॅम्पची व्यवस्था करावी तसेच अधिकाधिक दिव्यांग मतदारांना मतदान करता यावे यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. मतदान रांगेत दिव्यांगाना जास्तवेळ रांगेत थांबायला लागू याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

             मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य घेवून जाणाऱ्या वाहनांवर मॉनेटेरींग सिस्टिमची सुविधा बसविण्यात यावी. मतदारसंघात मतदारांसाठी आवश्यक उपाययोजना काय केल्या आहेत. मतदारसंघात  मतदार जागृतीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रम तसेच शिक्षक व पधवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणीबातचा आढावा तसेच   ईव्हीएम, व्हिव्हिपॅट हाताळणी,   वाहतूक , सिव्हिजील,आचारसंहिता,  अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक  प्रशिक्षण, मतदार जागृती, कायदा व सुव्यवस्था आदी बाबतही विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी बैठकीत आढावा घेतला. 

              यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात मतदान व मतमोजणीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची  तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांना दिली. तसेच पंढरपूर विधान सभा मतदासंघातील मतमोजणी व  मतदान केंद्रा वरील सुविधा तसेच निवडणूक कामकाजा बाबतची माहिती प्रांतधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
 
Top