आमच्या समोर कोणीच विरोधक नाहीत आणि आम्हाला कोणाची आव्हानेही नाहीत असे दावे करणाऱ्या सत्ताधारी भाजपला महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यातील मतदारांनी या निवडणुकीत जमिनीवर आणले आहे.हे होणारच होते याचे कारण फक्त आणि फक्त सत्ता हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्यात आली होती. राष्ट्रीय पातळीवर इतर पर्याय नसल्याने तिथे भाजप टिकली मात्र राज्यात आपणास आव्हान देणारे कोणी नाही असे त्या पक्षास वाटले आणि ती त्यांची चूक झाली याचे कारण ज्यास धडा शिकवायचा त्याच्याविरोधात कोणताही उमेदवार उभा राहिला तरी तो निवडणूक जिंकेल असे सत्ताधारी पक्षाला वाटत होते मात्र या निवडणुकीत मतदारांनी अशांना घरी पाठवले आहे .फसलेली नोटाबंदी, त्यामुळे आर्थिक विकास ठप्प, नोकरी नाही, औद्योगिक गुंतवणूक नाही तरीही आपण म्हणते ते मतदाराने मान्य करावे असे सत्ताधाऱ्यांचे वागणे होते अशावेळी मतदारांनी शहाणपना दाखवणे गरजेचे होते तो त्यांनी दाखवला म्हणून ही निवडणूक हा लोकशाहीचा विजय ठरतो आहे  मराठी ते  हिंदुत्ववाद करायचा ,विशिष्ट समाजाला लक्ष्य करत सतत त्या समाजावर उपकार केल्याची भाषा करायची, जसे काही हे समाज पाकिस्तानातून आलेले आहेत. काही समाज शांतीच्या मार्गाने काही मागत असतील तर त्यांना फाट्यावर कोलायचे ,त्यांच्या धर्मात ढवळाढवळ करायची यालाही काही मर्यादा असते. त्यामुळे मतदारांनी काही पक्षांना कड्यापर्यंत नेले पण कडेलोट केला नाही .त्यांना हा इशारा आहे.आता काही उद्दिष्ट हाती घेऊन बारा महिने कष्ट करावे लागतात आणि निवडणूक लढवण्याखेरीज काही कार्यक्रम कार्यकर्त्यांना आणि मतदारांना द्यावे लागतात हे लक्षात घ्यायला हवे. यासाठी शरद पवार हे मोठे उदाहरण आहे. शरद पवारांनी या वयात जे कष्ट घेतले त्यामुळेच या निवडणुकांचे चित्र बदलले आहे. इकडे सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवायचे आणि निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराचे मेरुमणी ठरवत त्यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीसा पाठवायच्या हा सत्ताधाऱ्यांचा दुतोंडीपणा आणि या कारवाईचे शरद पवारांनी सोने करत सरकारला एक पाऊल मागे घ्यायला लावले हा या निवडणुकीला कलाटणी देणारा क्षण ठरला. स्वतःच्या सत्ता मस्तीत असलेले आणि ती नसल्यामुळे असणारे सुस्तीत असणारे अशा दोघांनाही ही निवडणूक अंजन घालणारी ठरली आहे. यातून योग्य तो बोध घेत जो आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं कार्ट ही भावना सोडून देशवासीयांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना ग्राह्य धरून वर्तन करेल तर ते भविष्यात फायद्याचे ठरणार आहे.
 
Top