राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाच्या असा उल्लेख केल्यानंतर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी प्रत्युत्तर देत अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता हे मला सांगायला लावू नका असं म्हटलं आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्यासाठी ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.

लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपाच्या प्रचारफेरीत डान्स करण्यावरुन अजित पवार यांनी टीका करताना आता हा माणूस भाजपात जाऊन नाच्या झाला असा टोला लगावला होता. ‘हलगीचा आवाज आला की ढोबळेंच्या अंगात येतं. शरद पवार यांनी त्यांना मंत्री केलं, पण आता हा माणूस भाजपात जाऊन नाच्या झाला आहे. आपल्या वयाचा सुद्धा ते विचार करत नाहीत,’ असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

  लक्ष्मण ढोबळे यांनी अजित पवार यांच्या या टीकेला उत्तर दिलं आहे. “मी माझ्या पक्षाचा झेंडा घेऊन नाचलो आहे. तुम्ही कुठे कुठे नाचता हे मला सांगायला लावू नका,” असं लक्ष्मण ढोबळे यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावरुन त्यांचे संस्कार दिसतात असंही ते म्हणाले आहेत.

“अजित पवारांच्या अशा वक्तव्यांमुळेच राष्ट्रवादी पक्ष उद्ध्वस्त झाला असून पक्षाचं आणि शरद पवारांचं वाटोळ झालं. पण अजित पवारांमध्ये सुधारणा होताना दिसत नाही,” असंही ते म्हणाले आहेत. “अजित पवारांच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून त्यांना पश्चाताप झाला असं वाटत होतं. पण आपल्या वागण्यात सुधारणा काही केलेली नाही. धरणाचं पाणी खारट करणं काही थांबलेलं नाही,” असा टोला त्यांनी लगावला आहे.
 
Top