नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकार कडून गहू, ज्वारी, हरभरा आणि सूर्यफुलासह रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ ८५ रुपये ते ३२५ रुपयांपर्यंत असणार आहे. देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक समितीच्या बैठकीत हमीभावावर सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यानंतर हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. गव्हाचा किमान हमीभाव १८४० रुपयांवरून १९२५ रुपयांवर गेला आहे. बार्लीचा हमीभावदेखील ८५ रुपयांनी वाढवून १४४० रुपयांच्या तुलनेत १५२५ रुपये इतका करण्यात आला आहे. डाळींच्या उत्पादनात भरीव वाढ होण्याच्या अनुषंगाने सरकारने डाळवर्गीय पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली आहे. मसूर डाळीच्या हमीभावात ३२५ रुपयांची वाढ करून हमीभाव ४४७५ रुपयांच्या तुलनेत ४८०० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. 
  हरभरा डाळीच्या एमएसपी दरात २५५ रुपयांची वाढ करण्यात आली असून ४६२० रुपयांच्या तुलनेत या डाळीसाठी शेतकर्‍यांना ४८७५ रुपये इतका हमीभाव मिळेल.  मोहरीसाठी ४२०० रुपयांच्या तुलनेत ४४२५ रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. गहू हे रब्बी हंगामा तले सर्वात महत्वाचे पीक आहे. पुढील महिन्या पासून रब्बी हंगामातील पिकांची लागण सुरू होईल. 
 
Top