मंगळवेढा ,( प्रतिनिधी) -२५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात प्रचार सभेतून आमदार प्रशांत परिचारक व आमदार भारत भालके हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान अवताडे यांनी चुलते बबनराव अवताडे यांचा आधार घेत ताकद भक्कम केली असून पाणी, बेरोजगारी , एमआयडीसी या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून मतदारांना प्रभावित करत आहेत.

मंगळवेढा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे परिचारक गटात उत्साह वाढला असून खासदार अमोल कोल्हे यांच्या सभेमुळे आमदार भालके गटात आत्मविश्वास निर्माण झाला आहे .

 मंगळवेढा उपसा सिंचन योजना , बसवेश्वर व चोखोबांचे स्मारक, दुष्काळ निधी, पिक विमा, रब्बी दुष्काळ निधी याबाबत आजी-माजी  आमदार परिचारक ,आमदार भालके जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत असा आरोप अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केला आहे .

अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराला प्रभावी वक्ता व नेता नसतानाही प्रचारासाठी गती घेतली आहे. मतदारसंघातील वाढती बेरोजगारी, व्यसनाधिनतेचे वाढते प्रमाण यावर जोर देत आहेत . स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तालुक्यात उद्योग निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते सांगतात. सूतगिरणी व अवताडे उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे केलेले काम ते मतदारांसमोर मांडत आहेत.जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याला मिळालेला निधी आणि केलेली कामे या जोरावर ते विधानसभेला सामोरे जात आहेत.
 
Top