मंजू, जमुना, लव्हलिना यांचाही उपांत्य फेरीत प्रवेश

उलान-उदे (रशिया) :  सहा वेळा जगज्जेते पदावर नाव कोरणारी एम.सी.मेरी कोम (५१ किलो) हिने गुरुवारी महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्य पद स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी बॉक्सर म्हणून नावलौकिक मिळवला आहे. उपांत्य फेरीत धडक मारत मेरी कोमने आपले आठवे पदक निश्चित केले.
पदक निश्चित केल्याने आनंदी असले तरी शनिवारी अंतिम फेरी गाठण्याचा माझा प्रयत्न असेल. ही लढत माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण होती. गेल्या सामन्यापेक्षा माझ्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. आता उपांत्य फेरीतही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. – मेरी कोम
मेरी कोमसह सहावी मानांकित मंजू राणी (४८ किलो), जमुना बोरो (५४ किलो) आणि गेल्या वेळची कांस्यपदक विजेती तिसरी मानांकित लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) यांनीही उपांत्य फेरी गाठत भारताचे किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.
मणिपूरच्या मेरीने जागतिक स्पर्धेत आतापर्यंत सहा सुवर्ण आणि एक रौप्य आपल्या नावावर केले असून आता आठवे पदक तिच्या खात्यात जमा होईल. ५१ किलो गटातील हे पहिले जागतिक पदक ठरणार आहे. त्याचबरोबर मेरीने ऑलिम्पिक कांस्यपदक (२०१२, लंडन), पाच आशियाई विजेतेपदे, आशियाई तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अनेक पदके पटकावली आहेत. या वर्षी तिने इंडिया खुली आणि प्रेसिडेंट चषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
 
Top