पुणे - महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये काल बुधवार मुसळधार पाऊस झाला. यावेळी पुण्यात अक्षरश: ढगफुटी झाल्याचं दिसून आलं. कारण काल दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं दिसत होतं. पावसा मुळे आतापर्यंत पुण्यात ९ जणांचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती असून पुण्यातील अरण्येश्वर भागात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला तर सिंहगड रोडवर एक गाडी पुराच्या पाण्यात अडकल्याने त्यातील एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला. 


तर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने २ आणखी जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. 
   पुण्यात काल सकाळपासून पडत असलेल्या पावसाने मध्यरात्रीनंतर अचानक जोर धरला. त्यामुळे रात्री अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं. पुरामुळे अनेक गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यासोबतच बारामतीमध्ये देखील जोरदार पाऊस पडत असल्याने तिथेही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 
 
Top