सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

मुंबई, दि. ८ : सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने उद्या (दि.९) सकाळी १०.४५ वाजता मंत्रालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र व संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र मंत्रालयाच्या इमारतीत असावे, अशी मागणी होती. या मागणीबाबत शासन सकारात्मक होते. या अनुषंगाने तैलचित्र लावण्याबाबतचा पाठपुरावा सामाजिक न्याय विभागाने केला होता. यासाठी सामाजिक न्याय विभागाने निधीची तरतूद केली होती. हे तैलचित्र मुंबई येथील प्रसिद्ध चित्रकार आर.टी.कांबळे यांनी बनविले आहे.

या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते, मंत्रीमंडळाचे सर्व सदस्य, सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित राहणार असल्याचे डॉ. खाडे यांनी सांगितले.
 
Top