डॉ.हावळे दाम्पत्याची प्रशासनाकडून पाठराखण ?...


भंडीशेगाव ग्रामस्थांकडून आरोप...

पाठपुराव्यासाठी आंदोलनाची तयारी...

 पंढरपूर ( प्रतिनिधी )- संशयास्पद पद्धतीने स्त्री जातीच्या अर्भकास हॉस्पिटलमध्ये ठेवून घेणाऱ्या भंडीशेगाव  येथील डॉ. हावळे दाम्पत्याबद्दल  अनेक वर्षापासून गैरप्रकाराचे आरोप होत आहेत. या हॉस्पिटलमध्ये स्त्री जातीच्या अर्भकाची तस्करी,अवयवांची तस्करी आणि स्त्रीभ्रूणहत्या असे गैरप्रकार होत असल्याचा संशय असून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेल्या या डॉक्टर दाम्पत्याची चौकशी करून या गैरप्रकारांचा पोलिसांनी पर्दाफाश करावा, अशी अपेक्षा भंडीशेगाव ग्रामस्थांनी केली. असे असताना पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होत नसून पोलिस प्रशासन डॉ. हावळे दांपत्यास पाठीशी घालत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटना, भीमशक्ती संघटना आणि भंडीशेगाव ग्रामस्थांकडून करण्यात आला. याप्रकरणी व्यवस्थित चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. पंढरपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वाभिमानी संघटना, भीमशक्ती संघटना आणि भंडीशेगाव ग्रामस्थांनी प्रशासनावर जोरदार प्रहार केला.

  गेल्या चार दिवसापूर्वी भंडीशेगाव येथील डॉ. अतुल हावळे आणि डॉ .सुषमा हावळे यांच्या हॉस्पिटलमध्ये स्त्री जातीचे बेवारस अर्भकं आढळून आले होते. याबाबत माहिती देताना डॉ. हावळे दांपत्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने या डॉक्टर दाम्पत्यावर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पोलिस प्रशासनाकडून डॉ. हावळे दांपत्याची पाठराखण होत असल्याचा आरोप भंडीशेगाव ग्रामस्थांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भीमशक्ती संघटनेच्यावतीने पंढरपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला. या परिषदेत पंचायत समितीच्या सदस्य पल्लवी यलमार, साधना गिड्डे, भंडीशेगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष नन्नवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ माने, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गिड्डे, स्वाभिमानीचे तालुका संघटक चंद्रकांत बागल, बाळाबाई रणखांबे, माधुरी गुरव, सचिन पाटील , तानाजी बागल, आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, भीमशक्ती संघटना आणि भंडीशेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
 
तब्बल पाच दिवस नवजात अर्भकाची अवहेलना
 डॉ. हावळे दाम्पत्याच्या हॉस्पिटलमध्ये आढळून आलेले स्त्री जातीचे नवजात २६ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांच्या नजरेस आले. याबाबत विचारणा होताच डॉ. दांपत्याने हे अर्भक गायब करून दिल्लीला पाठवले असल्याचे सांगितले. यापूर्वी अशी अनेक स्त्री जातीची अर्भके आपल्या संघटनेमार्फत आपण अनाथाश्रमात पाठवली असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. परंतु याबाबत अधिक विचारणा होताच २९ ऑगस्ट रोजी हे अर्भक पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. या प्रकारामध्ये अर्भकाची अवहेलना झाल्याचा प्रकार भंडीशेगाव ग्रामस्थांनी कथन केला. यामुळे संशयात वाढ होऊन डॉ. हावळे दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ.हावळे दांपत्याबाबत संशयित मुद्दे 

*हावळे दांपत्यांकडे कोट्यवधींची संपत्ती 
*मुली जास्त असलेल्या काही मातांकडे डॉ.हावळे यांनी मुलीची मागणी केली होती.
*या हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार होत असल्याची चर्चा अनेक वर्षापासून सुरू आहे. यापूर्वी जास्त मुली असलेल्यांकडून मुली घेऊन आपण या मुलींचे संगोपन करण्यासाठी अनाथाश्रमात पाठवण्याचे काम केले आहे असा युक्तिवाद डॉ. सुषमा हावळे यांनी  ग्रामस्थांसमोर केला.
 *वादग्रस्त ठरलेले स्त्री जातीचे अर्भक तीन दिवस बेपत्ता असणे संशयास्पद आहे. हे संशयास्पद अर्भक मोडनिंब येथील माता पित्याकडे सोपविण्यात आले. परंतु त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही.
 
Top