वारी काळात दररोज आठ हजार लिटर आर.ओ. युक्त पाण्याचे वाटप


पंढरपूरः(संतोष हलकुडे)-‘संपूर्ण विश्वातील नागरिक महाराष्ट्रातील संत महात्म्यांचे महत्व जाणून आहेत त्यामुळे आषाढी वारीकडे अनेकांचे लक्ष लागून राहते. यामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या वारीतील दर्शन रांगेत असणाऱ्या आणि तहानलेल्या वारकऱ्यांना स्वेरीचे विद्यार्थी दरवर्षी आर.ओ. युक्त पिण्याच्या पाण्याचे वाटप करतात. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. वारकऱ्यांची सेवा करण्याची स्वेरीची परंपरा उत्तम आहे. आपले हे पुण्यकर्म पांडुरंगापर्यंत पोचते. शुद्ध पाणी देण्याचे उत्तम कार्य स्वेरी करत आहे. हे कौतुकास्पद आहे.’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय यांनी केले. 
     

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या व दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांची तहान स्वेरीचे विद्यार्थी भागवीत आहेत. या उपक्रमाचे उदघाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यअधिकारी प्रा.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते रिद्धी-सिधी गणेश मंदिरानजीक असलेल्या पत्राशेड जवळ करण्यात आले. याप्रसंगी प्रा. भारतीय बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य टीचर एज्युकेटर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशम कोल्हे, श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे विश्वस्त प्रा.सुरज रोंगे आदी उपस्थित होते. स्वेरी संचलित चारही महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ व ‘कमवा आणि शिका’ योजना’ यामधील जवळपास ३०० विद्यार्थी व प्राध्यापक एकत्रित येतात आणि नियोजन करून पाण्याचे वाटप सुरु होते. स्वेरीमार्फत गेल्या २१ वर्षापासून वारकऱ्यांना पाणी देण्याचे कार्य स्वेरी करत आहे. यंदाही संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी वाटपाचे कार्य सुरु झाले आहे. प्रारंभी दर्शन रांगेत उभे असलेले वारकरी किरण तुळशीराम शिंदे (रा. वाई, जि. सातारा) यांना आर.ओ.युक्त पाणी देवून या पाणी वाटपाचे उदघाटन करण्यात आले. पाणी वाटप प्रसंगी डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, समन्वयक प्रा. सुनील भिंगारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एन.हरिदास, प्रा. एस.एम.शिंदे, सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख प्रा. करण पाटील, इतर विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत रिध्दी-सिध्दी मंदिरापासून गोपाळपूरपर्यंत व पुढे स्वेरीज् कॉलेज मार्गात विद्यार्थी आर.ओ. युक्त शुध्द पाण्याचे वाटप करत आहेत. नवमी, दशमी व एकादशी या तीन दिवशी तहानलेल्या वारकऱ्यांना आर.ओ. युक्त शुध्द पाण्याचे वाटप करण्यात येते. विद्यार्थी हे ग्लास, वॉटर जग, वॉटर टॅंकद्वारे पाणी वारकऱ्यांपर्यंत पोहचवत होते. दररोज साधारण दहा हजार लिटर शुद्ध पाण्याचे वाटप केले जाते. स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार यांनी या पाणी वाटपाचे नियोजन उत्तम प्रकारे करत आहेत. 
      उदघाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले.आभार प्रा.सुनिल भिंगारे यांनी मानले. 
 
Top