* वैद्यकीय व्यवस्थेचा घेतला आढावा *

  बीड,दि.१६:- ग्रामीण महिलांच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी महिलांबरोबरच पुरुषांमध्ये जागृती आवश्यक आहे याच बरोबर मुलगा मुलगी यांचं गुणोत्तर यासाठी देखील याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल ,असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.
       विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आज चार सदस्यीय चौकशी समिती सह जिल्हा दौऱ्यावर आगमन झाले.त्या गेवराई उपजिल्हा रुग्णालय भेटी प्रसंगी त्या बोलत होत्या . यावेळी त्यांच्यासमवेत आमदार विद्या चव्हाण, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ व्यास , डॉ. शिल्पा नाईक , ज्योती कोटकर आदी होते .
 श्रीमती डॉ .गोऱ्हे यांनी यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी ,परिचारिका यांच्याशी चर्चा केली. त्यांनी रुग्ण कल्याण समिती तसेच उपजिल्हा रुग्णालयातील दैनंदिन नियमित कामकाजाची माहिती घेतली.
      यावेळी डॉ गोऱ्हे म्हणाल्या,ग्रामीण महिलांच्या आरोग्यमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे.बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्यांचा विचार करता ऊसतोडीवर जाणाऱ्या महिला कामगारांबाबत चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी उपायोजना केले जाणे गरजेचे आहे. तसेच मुलींचा जन्मदर उंचावण्यासाठी पुरुषांच्या जनजागृतीची गरज विचारात घेता ग्रामीण व्यवस्थेतील आशा सेविका बरोबर पुरूष वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे योगदान आवश्यक आहे.यादृष्टीने रुग्णालय स्तरावर निरीक्षण व नियंत्रण प्रणाली विकसित होणे गरजेचे आहे रुग्ण कल्याण समिती सक्षमपणे कार्यान्वित होणे गरजेचे आहे ग्रामीण महिलांचा आरोग्याबद्दल त्यांच्या घरातील पुरुषांना देखील जागृतता येणेसाठी प्रयत्न केले जावे असे विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
        आरोग्य उपसंचालक एकनाथ माले,जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी बी. आर. पवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांनी त्यांना रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या या सुविधांची माहिती दिली.
       त्यानंतर त्यांनी अंतर रुग्ण महिला कक्षाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांची विचारपूस केली. तसेच रुग्णालयातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांची पाहणी केली . तसेच त्यांनी रुग्णांचे नातेवाईक नागरिक लोकप्रतिनिधी यांचे म्हणणे जाणून घेतले.
 
Top