पंढरपूर- श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल कासेगाव, यांच्यावतीने पंढरपूर शहरामध्ये ‘वाहतूक सुरक्षा जनजागृती’रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. यामध्ये एकूण ९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सुरक्षा जनजागृती रॅलीचा मुख्य उद्देश गाडी चालविताना हेल्मेटचा वापर करणे, वाहन नियमात चालवणे हा होता. यावेळी संस्थेचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे तसेच खजिनदार दादासाहेब रोंगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली. शिवाजी चौक येथून सुरू झालेल्या रॅलीमध्ये मुलांनी अनेक वाहतूक सुरक्षेसंदर्भात घोषणा दिल्या. ‘नियम पाळा, अपघात टाळा’, ‘सडक पर मस्ती, जान नहीं सस्ती’, अशा अनेक घोषणा दिल्या तसेच स्टेशन रोडवर ज्या व्यक्तींनी  हेल्मेट घालून वाहन चालवीत होते त्यांचा गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात येत होते. यावेळी योगेश भांगिरे, सोलंकरवाडी तालुका माढा, दत्ता खताळ खर्डी  तालुका पंढरपूर, तसेच अनेक नागरिकांचे पुष्प देवून स्वागत व सत्कार करण्यात आले. लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण यांनी रॅलीचे नेतृत्व केले. रॅलीची सांगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून केली याठिकाणी देखील वाहतूक सुरक्षा व नियम यांच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी पोलीस कर्मचारी पवार, मयूर वागज, संपत लवटे, दादासाहेब पटेल,अमोल ढोणे, अस्मिता घोलप, पालक वर्ग आदी उपस्थित होते.
 
Top