पंढरपूर , दि.२३ - पालखी मार्गावरील गावांमध्ये स्वच्छता रहावी आणि रोगराईला थारा मिळू नये यासाठी निर्मलवारी अभियानातंर्गत वाखरी पालखी तळांची स्वच्छता करण्यात आली. सोहळयासोबत येणाऱ्या भाविकांना सेवा देण्यासाठी प्रशासनासोबत, स्थानिक स्वराज्य संस्था स्वंयसेवी संस्था सज्ज झाल्या असल्याचे तहसिलदार बर्गे यांनी यावेळी संगितले.
आषाढी वारी पालखी सोहळ्यात पालखी मार्गावरील गावामध्ये स्वच्छता रहावी यासाठी निर्मल वारी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषगांने वाखरी पालखी तळावर प्रशासनाच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेत वाखरी पालखी तळावरील काटेरी झुडपे काढणे, पालापाचोळा व इतर कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच पालखी तळांवरील झाडांच्या बाजुने खड्डे घेवून पाणी घालण्यात आले.
पालखी तळा व्यतिरिक्त ज्या ठिकाणी दिंड्या व वारकरी थांबतात त्या ठिकाणची स्वच्छता केली जाणार आहे. गावामध्ये कोणत्याही प्रकारची घाण किंवा आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले.
या स्वच्छता मोहिमेत तहसिलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके यांच्यासह तहसिल, पंचायत समिती, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, वाखरीचे ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ, आश्रम शाळेचे विद्यार्थी तसेच स्वस्त धान्य दुकानचे संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते.