मुंबई - दि.११.६.२०१९ - अखिल महाराष्ट्र तसेच परराज्यातून सुद्धा पंढरपूर आषाढी यात्रेसाठी वारकरी भाविक भक्त लाखोंच्या संख्येने येत असतात. आलेल्या सर्व भाविक भक्तांना योग्य त्या पायाभूत  सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न होतात, मात्र अलीकडच्या काळामध्ये भाविकांची वाढणारी लक्षणीय संख्या त्याचबरोबर मानाच्या सात संतांच्या पालख्या तसेच वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या शेकडो दिंड्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय बराच वेळ तोकडे पडतात किंवा उच्चस्तरीय परवानगी नसल्याने काही निर्णय रखडले जातात . तरी पंढरपूरची आषाढी यात्रा हे महाराष्ट्राचं वैभव असून उत्तर प्रदेश मधील प्रयागराज 'कुंभमेळा' मेळा धर्तीवर आषाढी यात्रेचे सुयोग्य नियोजन व्हावे याकरिता मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक पंढरपूर येथे घ्यावी अशी मागणी  राष्ट्रीय अध्यक्ष देवव्रत (राणा)महाराज वासकर यांच्या नेतृत्वाखाली व ना.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वारकरी सांप्रदाय पाईक संघाच्या शिष्टमंडळाच्यावतीने मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करण्यात आली. 

           पंढरपुरात मंत्रिमंडळाची बैठक झाल्या मुळे मानाच्या सात पालख्यांचे प्रमुख तसेच  वारकरी महाराज मंडळी यांच्याशी चर्चा करून  निर्णय घेतल्यामुळे आषाढी सुयोग्य नियोजन होऊन, एक नवा आदर्श महाराष्ट्र शासनाने निर्माण करावा, अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे वतीने बर्याच कालावधी पासून प्रलंबीत असणाऱ्या काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या वेळी पाईक संघाचे पदाधिकारी ह.भ.प .रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, ह.भ.प.देविदास महाराज ढवळीकर, ह.भ.प.हरि महाराज लबडे व मंगेश चिवटे उपस्थित होते.

      मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात त्वरित निर्णय घेऊन मंत्रीमंडळाची  बैठक घेण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील व इतर प्रलंबीत मागण्यावरही तात्काळ त्या सोडवण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागास सुचना देणार असल्याचे आश्वासन दिले.

 
Top