अत्यंत तीव्र अशा फॅनी चक्रीवादळाने ओडिशाच्या किनारी भागाला जोरदार धडक दिल्यानंतर या ठिकाणी मदतकार्य करण्यास सुरुवात झाली आहे. सर्व स्तरांमधून येथील लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक राज्यांकडूनही मदतकार्य सुरु झालंआहे. त्यातच आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री मदतनिधीच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा मदतनिधी जमा केल्याचं सांगण्यात येत आहे.आजवर कोणतंही राष्ट्रीय संकट आल्यावर किंवा अन्य कोणत्याही राज्यावर अशी परिस्थिती ओढावल्यावर अक्षय कुमारने त्याचा मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षयने या पीडितांसाठी तब्बल १ कोटी रुपयांची मदत केली आहे. या पूर्वीही अक्षयने ‘भारत के वीर’ या अँपच्या माध्यमातून मदतनिधी जमा करुन पीडित व्यक्तींना मदत केली आहे.यापूर्वी काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यावेळी देखील अक्षय कुमारने शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने भारत के वीर या अँपच्या सहाय्याने तब्बल सात कोटी रुपये मदतनिधी जमा केला होता.

   दरम्यान, फॅनी वादळामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. या वादळामुळे राज्याचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं असून केंद्र सरकारकडून १ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

 
Top