नव्या प्रदूषण नियमावलीनुसार बीएस ६ श्रेणीतील डिझेल इंजिन तयार करणे परवडणारे नसल्याने मारुतीने डिझेलच्या कार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता यामध्ये आणखी एका मोठ्या भारतीय कंपनीने नंबर लावला आहे. छोट्या कारमधील डिझेल इंजिने बंद करण्याची घोषणा केल्यानंतर टाटा मोटर्सचे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार BS-VI उत्सर्जन मानकांमुळे डिझेलचे इंजिने महाग होणार आहेत. यामुळे ग्राहक त्याकडे पाठ फिरवतील. देशातील सर्वात मोठी कंपनी मारुतीने गेल्या आठवड्यात १ एप्रिल २०२० पासून डिझेलच्या कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे १ एप्रिल २०२० पासून ही नवी नियमावली सुरु होणार आहे. टाटा मोटर्सकडे एन्ट्री लेव्हल हॅचबॅक Tiago मध्ये १ लीटरचे डिझेल इंजिन देण्यात येते. हे तीन सिलिंडर इंजिन असल्याने आवाजही खूप येतो. तसेच टिगॉरला १.५ लीटर, बोल्ट, झेस्ट या मॉडेलनाही जुने इंजिन देण्यात आलेले आहे. या गाड्यांना जर नवे डिझेल इंजिन दिल्यास त्यांच्या किंमती २ ते २.५ लाखांनी वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ते ग्राहकांना परवडणारे नाही. यामुळे १ एप्रिल २०२० पासून टाटा मोटर्सही डिझेलच्या कार बंद करेल.Tata Motors चे वाहन विभागाचे अध्यक्ष मयांक पारेख यांनी सांगितले की, छोट्या आणि मध्यम आकाराच्या डिझेल इंजिनच्या कारची मागणी कमी झाली आहे. यामुळे नवीन इंजिन विकसित करण्यासाठीचा खर्च मोठा असणार आहे. पारेख यांनी सांगीतले की, BS-VI इंजिनसोबत छोट्या डिझेल कारचा खर्च वाढेल आणि त्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. यामुळे वाहनांची मागणी घटेल.


 
Top