पंढरपूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ पंढरपूरात आज शुक्रवारी सकाळी भव्य पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते. 

यात सुशीलकुमार शिंदे हे स्वतः सहभागी झाले होते. पंढरपूर व मंगळवेढ्यात आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांच्या प्रचाराचे नियोजन केले जात आहे. शहर व तालुक्यात तसेच मंगळवेढा भागात भालके यांच्या गावोगावी सभा ही रोज होत आहेत. या मतदारसंघातील दुसर्‍या मोठ्या शहरात म्हणजे पंढरपूरात आज पदयात्रा काढण्यात आली होती. यात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील ,आमदार रामहरी रुपनर शहराध्यक्ष अ‍ॅड. राजेश भादुले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,दिनकर पाटील, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे ,शशिकांत शिरगिरे , 
काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार,शंकर सुरवसे, सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष भिमाशंकर जमादार, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नागेश गंगेकर व समता परिषदेचे जिल्हा कार्यअध्यक्ष अनिल अभंगराव व जेष्ठ कार्यकर्ते मामा फलटणकर यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.

पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून यास सुरूवात झाली. या यात्रेचा मार्ग भादुले चौक, नाथ चौक, भजनदास चौक महाद्वार चौक, कालिकादेवी चौक, रोहिदास चौक, महात्मा फुले चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँक असा होता.

हलग्यांच्या कडकडाट यावेळी सुरू होता. उघड्या जीपमधून सुशीलकुमार शिंदे हे मतदारांना अभिवादन करत होते. उन्हाची तीव्रता असताना ही रॅलीमध्ये सहभागी लोकांचा उत्साह कमी नव्हता. या पदयात्रेत सहभागी महिलांची संख्या ही लक्षणीय होती. शुक्रवारी शिंदे यांनी संपूर्ण दिवस पंढरपूर शहरासाठीच राखीव ठेवला होता. येथील टिळक स्मारक मंदिरात त्यांनी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांशी संवाद साधला.
 
Top