पंढरपूर– ‘आपण करत असलेल्या कार्यात एकाग्रता, विकासात्मक भूमिका आणि त्यामुळे होणारा फायदा हा शेतकरी अथवा पशु पालकास समजावून सांगितला तर तो पशुवैद्यक हा ‘सर्वोत्कृष्ठ’ ठरतो आणि त्याची ग्रामीण भागातील नागरिकांमधून अधिक मागणी होत असते. कारण त्याच्या कार्यातूनच त्याची कामगिरी अधिक डोकावत असते. उत्कृष्ठ काम केल्याने समाजात अधिक मान्यता मिळत असते. त्यासाठी प्रत्येक कामात नियोजन, चुणूक आणि विकासाची दिशा असली पाहिजे.’असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे सहआयुक्त पशुसंवर्धन तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश बनसोडे यांनी ‘भविष्य काळातील पशुवैद्यकांपुढील आव्हाने’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
        ‘जागतिक पशुवैद्यक दिना’निमित्त येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये तांत्रिक परिसंवादाचे आयोजन केले होते.प्रारंभी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.चंद्रकांत निंबाळकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सहा.आयुक्त दिनकर बोर्डे यांनी या परिसंवादाच्या आयोजनाचा हेतू सांगितला. स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘पशुपालनाचा संस्कार हा भगवान श्रीकृष्णाच्या अगोदरपासून सुरु आहे त्यामुळे देवळांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आता पशुपालनाचा देश म्हणून देखील आदराने जगाच्या नकाशात ओळख निर्माण झाली आहे. परंतु आज पशुपालन करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत त्याचे निराकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शासन व जेष्ठ पशुपालन तज्ञांच्या सहकार्याने सांघिक उपक्रमाची गरज आहे.’ यावेळी साताऱ्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अंकुश परिहार,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चंद्रशेखर देवेज्ञ, सोलापूरचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.नानासाहेब सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले . 
   यावेळी डॉ. सॅम रुद्रीक, डॉ. विजय डोके, डॉ. सचिन वंजारी, डॉ. सत्यवान भिंगारे व डॉ. सुहास अनुसे यांना स्व. सुहास देशपांडे उत्कृष्ठ पशुवैद्यक पुरुस्काराने सन्मानित करण्यात आले.विजेत्यांनी प्रतिक्रिया देताना‘ या पुरुस्कारामुळे नियमितच्या कार्यात उर्जा आली असून कामाची पोच पावती मिळाल्यामुळे समाधान वाटते’असे सांगितले. या परिसंवादासाठी जिल्ह्यातील सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी,सचिव अनिलकुमार सरदेशमुख, पुण्यातील डॉ. जवाहरलाल साळुंखे, डॉ. ढगे, डॉ. कदम, डॉ. चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातून जवळपास तीनशे पशुवैद्यक, पशु पालक व अधिकारी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात लघु चिकित्सालय, पंढरपूर मध्ये २४१ श्वानाना मोफत श्वान दंश प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.विश्वासराव मोरे यांनी केले. आभार डॉ. सदानंद टाकणे यांनी मानले.
 
Top