नवी दिल्ली – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता हत्येचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालात रोहितचा मृत्यू गुदमरुन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

रोहित शेखर तिवारींच्या मृत्यूप्रकरणी आधी दिल्ली पोलिसांकडे तपास सोपवण्यात आला होता. मात्र आता हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलं आहे. क्राईम ब्रांचची टीम आणि सीएफएसएलने रोहित शेखर यांच्या घरी तपास करत पुरावेही गोळा केले.

रोहित शेखर यांच्या पोस्टमार्टममध्ये त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रोहित शेखर तिवारी १५ एप्रिल रोजी बाहेरुन घरी परतले. घरातील नोकरांचा जबाब आणि सीसीटीव्ही फूटेजवरुन रोहित मद्यधुंद अवस्थेत घरी परतल्याचे स्पष्ट झाले आहे. घरी परतताच ते आपल्या खोलीत जाऊन झोपले. १६ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास रोहित शेखर यांचा मृतदेह संशयास्पद स्वरुपात सापडला होता. दरम्यानच्या काळात रोहित यांना कुणीही उठवण्याचा प्रयत्न केला नाही.
रोहित शेखर यांच्या हृदयाची क्रिया बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती. रोहित यांना मंगळवारी १६ एप्रिल रोजी संध्याकाळी दिल्लीच्या साकेत मॅक्‍स रुग्णालयात मृतावस्थेत आणले होते. त्यानंतर डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 
Top