पुणे : केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्‍या उपस्थितीत जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्‍या तयारीचा आढावा घेतला.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीस मावळ लोकसभा मतदार संघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक अशोक कुमार सिंग, शिरुर लोकसभा मतदार संघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक एस. हरीकिशोर,पोलीस ऑब्‍झर्व्‍हर आभासकुमार, मावळच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीच्‍या चौथ्‍या टप्‍प्यात मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत वेगवेगळ्या माहिती-तंत्रज्ञान साधनांचा वापर करण्‍यात येत आहे, त्‍यानुसार निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्‍यात आले असल्याचे जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले. दिव्‍यांग मतदारांवरही यावेळी विशेष लक्ष केंद्रीत करण्‍यात आले असून एकही मतदार सुटता कामा नये, हे लक्षात घेवून मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येतील, असेही त्‍यांनी सांगितले.

बैठकीत सी-व्हिजिल ॲप, एक खिडकी योजना, टपाली मतपत्रिका, वेब कास्‍टींग, सूक्ष्‍म निरीक्षक, निवडणूक खर्च देखरेख आदींची माहिती देण्‍यात आली.

जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अवैध शस्‍त्रजप्‍ती, कायदा व सुव्‍यवस्‍था याबद्दलची माहिती दिली. जिल्‍ह्यातील निवडणूक तयारी उत्‍तम दिसत असून निवडणुका शांत आणि नि:पक्ष वातावरणात पार पडतील असा विश्‍वास निवडणूक निरीक्षकांनी व्‍यक्‍त केला.
'महान्यूज'

 
Top