सोलापूर : भव्य सायकल रॅली आणि सुमारे सात हजार नागरिकांनी केलेली साखळी यांच्या माध्यमातून आज मतदार जागृतीचा जागर सोलापुरात करण्यात आला.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा मतदार जनजागृती समिती मार्फत आज सोलापुरात सायकल रॅली आणि मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. सायकल रॅलीत सुमारे एक हजार विद्यार्थी, अधिकारी, नागरिक आणि मतदार सहभागी झाले होते. तर इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर करण्यात आलेल्या साखळीत सुमारे सात हजार नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व मतदार सहभागी झाले होते.

आज सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, स्वीप समितीचे सहअध्यक्ष अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते.

यशस्वी व सदृढ लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघात तर २३ एप्रिल २०१९ रोजी माढा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून या दिवशी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले.

लोकशाही सदृढतेसाठी मतदान करण्याचा संकल्प करुया, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप समितीचे अध्यक्ष डॉ. भारुड यांनी केले.

मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेली सायकल रॅली चार पुतळा हुतात्मा चौक येथे सुरु होऊन डॉ. आंबेडकर चौक, डफरीन चौक, कामत हॉटेल, व्ही.आय.पी. रोड, सात रस्ता चौक, रंगभवन चौक, जिल्हा परिषद, सिध्देश्वर प्रशाला मार्गे जाऊन इंदिरा गांधी स्टेडीयम येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.


मतदार जागृतीसाठी मानवी साखळी
मतदारांमध्ये जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढून लोकशाही बळकट व्हावी यासाठी आज इंदिरा गांधी पार्क स्टेडीयम येथे मानवी साखळी करण्यात आली. या साखळीच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाचा लोगो साकारण्यात आला. मानवी साखळी मध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी उपस्थिताना मतदानाबाबत शपथ दिली.

यावेळी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, प्रशासन अधिकारी सुधा - साळुंके, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे आदी उपस्थित होते.
'महान्यूज'

 
Top