राज ठाकरेंच्या टीकेला नांदेडच्या भोकरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना , अशोक चव्हाणांनी प्रचारासाठी नेताही भाडोत्री आणला, भाडोत्री नेता आणून अशोक चव्हाण समर्थन मागत आहेत असं म्हणत  अशोक चव्हाण आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे यांची नांदेडमध्ये सभा पार पडली त्या सभेत मुख्यमंत्री आणि मोदींवर टीका करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राशी काहीही देणंघेणं नाही, ते महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवायला निघाले आहेत असा आरोप केला होता .
महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याचा आरोप राज ठाकरे माझ्यावर करत आहेत. मात्र यासंदर्भातला करार अशोक चव्हाणांनी केला होता आणि मी तो रद्द केला आहे. अशोकराव तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तु्म्ही नांदेडला किती पैसे दिलेत सांगा? आम्ही २ हजार २२६ कोटी थेट शेतकऱ्यांना दिले हे तुम्ही कसं विसरता? असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे हे आम्ही जाणतो त्याचमुळे मोदींनी एक घोषणा केली आहे की शेतकरी साठ वर्षांचा झाला की त्यालाही पेन्शन देण्यात येईल. जगात शेतकऱ्यांना पेन्शन देणारं भारत हे पहिलं राष्ट्र ठरलं आहे. गरीबी हटावचा नारा राहुल गांधी देत आहेत. इतक्या वर्षांनी ही घोषणा देताना लाज कशी वाटत नाही? असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीवरही निशाणा साधला आहे.
     तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला नांदेडात माझ्या विरोधात सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांना भाड्याने उमेदवार आणावा लागला. त्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना नांदेडकरांना उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही. नांदेडचा विकास कोणी केला? हे नांदेडच्या जनतेला माहित आहे. नांदेडकरांनी महापालिका निवडणुकीतही या भाड्याच्या नेतृत्वाचा दारूण पराभव केला आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीतही होईल. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये देशातील ज्वलंत प्रश्नांना बाजूला ठेवून लष्कराच्या नावावर मते मागण्याचा किळसवाणा प्रकार सुरु केला आहे. मागील पाच वर्षात राज्यात १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. सरकारने मोठा गाजावाजा केलेली जलयुक्त शिवार योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. राज्यभरात चार हजारांहून अधिक टँकर सुरु आहेत तरीही जनतेला प्यायला पाणी मिळत नाही. या भीषण दुष्काळात सरकार शेतक-यांना आर्थिक मदत देऊ शकले नाही. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देता आला नाही. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करू शकले नाही. त्यामुळे गावेच्या गावे ओस पडली असून या परिस्थितीतही आपण शेतक-यांसाठी खूप काही करीत असल्याचा आव आणताना मुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही? , अशी घणाघाती टीका करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्त्युत्तर दिले आहे.
मात्र नेमके कोण भाडोत्री गडी वापरत आहेत ? हा प्रश्न जनतेमधून विचारला जात आहे.
 
Top