मंगळवेढा तालुक्यांमध्ये भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे या तालुक्यांमध्ये नेहमीच दुष्काळ पडत असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन म्हणून पशुधन संभाळून दुग्ध व्यवसाय केला जात आहे .परंतु सध्या या जनावरांना त्या भागामध्ये चारा आणि पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे प्रशासनाच्या वतीने अनेक छावण्या सुरु करण्यात आलेल्या आहेत . छावण्या सुरू करत असताना ज्या अटी घातलेल्या आहेत त्या अटी शिथिल करण्याची गरज असून प्रशासनाने त्याची वस्तुस्थिती तपासून त्वरित निर्णय घ्यावा , अशी मागणी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ शैला गोडसे यांनी केली. त्यांनी आंधळगाव आणि लेंडवेचिंचाळे येथील जनावरांच्या छावण्यांना भेट देऊन पाहणी केली .त्यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांची आणि छावणी चालकांची चर्चा करुन माहिती घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना शहर संघटक सलीम खतीब ,शहर उपप्रमुख सतिश शिर्के ,शहर उपप्रमुख रमेश जाधव आदी शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते

छावणी सुरू करताना एका छावणीमध्ये जनावरांची संख्या ही पाचशेपर्यंत मर्यादित ठेवलेली आहे ,परंतु आता या भागांमध्ये कुठेच चारा उपलब्ध होत नसल्याने छोटे-मोठे प्रतिष्ठित शेतकरी सुद्धा आपली जनावरे छावणी मध्ये  घेऊन येत आहेत ,परंतु छावणीमधील ५०० जनावरांची मर्यादा संपल्यामुळे छावणी चालकाकडून इतर जनावरांना दाखल करून घेतले जात नाही, त्यामुळे अशा जनावरावर उपासमारीची वेळ येत असून प्रशासनाने एका छावणीमधील जनावरांची मर्यादा अट शिथिल करावी आणि त्या छावणीमध्ये जेवढी म्हणून जनावरे दाखल होतील तेवढ्या सर्व जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे .यामध्ये प्रशासनाला काही संशय येत असल्यास त्यांनी वेळोवेळी तपासणी करावी. परंतु कोणतेही जनावर चाऱ्याशिवाय आणि पाण्यावाचून उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची असणार आहे.

या छावण्यांमध्ये दाखल झालेली बहुतांश जनावरे ही दूध देणारी जरशी गाई स्वरूपाची आहेत .या जरश्या गाईंना भरपूर चारा लागतो परंतु प्रशासनाने एका जनावराला १५ किलो चारा आणि अर्धा किलो पशुखाद्य ऐवजी २० ते २५ किलो चारा आणि एक किलो पशुखाद्य देण्याबाबतची आग्रही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाने जनावरांच्या छावण्या सुरू केल्याची बाब स्वागतार्य असली तरी पशुधन वाचवण्यासाठी प्रशासनाच्या काही जाचक अटी शिथिल करणे आवश्यक आहे त्यासाठी आपण तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांची समक्ष भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहोत -
सौ शैला गोडसे,जि .प .सदस्य

तसेच ज्यावेळी छावण्यांचे प्रस्ताव मागवले होते त्यावेळी पाणी उपलब्ध होईल असे समजून छावणी चालकांनी पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली होती परंतु आत्ताच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये त्या परिसरातील सर्व विहीर आणि बोरवेल कोरडे ठणठणीत पडल्यामुळे जवळपास कुठेच पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे छावणी चालकांची इच्छा असूनही जनावरांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

या सर्व वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने ज्या अटी घातलेल्या आहेत त्या अटी शिथिल करून पशुधन वाचवावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांच्यावतीने जि प सदस्य शैला गोडसे यांनी केली आहे.

 
Top