नवी दिल्ली:

धर्माच्या नावावर मतं मागत आचारसंहितेचं उल्लंघन करणं बसपा प्रमुख मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भोवलं आहे.निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार योगी आदित्यनाथ १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी तर मायावती १६ आणि १७ एप्रिल रोजी प्रचार करू शकणार नाहीत. बंदीच्या काळात या दोन्ही नेत्यांना सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही. त्यांना या काळात कोणतीही मुलाखत देता येणार नाही, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. या काळात या दोन नेत्यांना कोणताही रोड शो आणि निवडणूक प्रचार सभाही घेता येणार नाही. १६ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजल्यापासून ही बंदी लागू होणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने मायावती यांच्या देवबंदमधील भाषणावर आक्षेप घेतला होता. धर्माच्या नावावर मतदान मागणाऱ्यांविरोधात आयोग काय कारवाई करत आहे? असा सवाल न्यायालयाने केला होता. या नेत्यांना केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. कठोर कारवाई का केली जात नाही? असा सवाल करत न्यायालयाने आयोगाला फटकारले होते. त्यानंतर आयोगानं मायावती आणि आदित्यनाथ योगी यांंच्या विरोधात केलेली ही २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठी कठोर कारवाई आहे.

 
Top